spot_img
अहमदनगरश्रीगोंद्यातील शांतता वादळापूर्वीची तर नव्हे ना?

श्रीगोंद्यातील शांतता वादळापूर्वीची तर नव्हे ना?

spot_img

‘मविआ’कडून राहुल जगतापांची उमेदवारी अंतिम | सार्‍यांची मोर्चेबांधणी चालू असताना जगतापांचे पाय जमिनीवर

सारिपाट / शिवाजी शिर्के –
राज्याच्या राजकारणात कायमच सर्वाचेच लक्ष वेधून राहिलेला मतदारसंघ म्हणजे श्रीगोंदा मतदारसंघ! शेवटच्या क्षणापर्यंत येेथे कोणाचा पत्ता कापला जाईल आणि कोणाचं भाग्य उजाळेल याबाबतची उत्सुकता कायम राहिली आहे. निवडणूक कोणतीही असली तरी येथे वादळ येतेच! यावेळी परिस्थिती जराशी वेगळी आहे. विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या घरातील उमेदवार कोण हे अद्यापही समोर आलेले नाही. मात्र, त्याचवेळी पाचपुते यांच्या विरोधात कोण यासाठी पाच- सहाजणांनी तयारी चालवली असल्याचे दिसते. राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या गटाकडून माजी आमदार राहुल जगताप यांची उमेदवारी अंतिम झाली असताना व पवारांसह त्यांच्या पक्षातील बहुतांश नेत्यांनी जगताप यांना हिरवा कंदील दाखवला असतानाही राहुल जगताप व त्यांचे समर्थक संयमी भूमिकेत दिसतात. त्यांची ही संयमी भूमिका वादळा पूर्वीची शांतता तर नाही ना असा प्रश्न आता नगर जिल्ह्यातील राजकीय जाणकरांना पडलाय!

महायुतीमध्ये श्रीगोंद्याची जागा भाजपाकडे राहणार आणि उमेदवार पाचपुते हेच असणार हे नक्की झालेय! पाचपुतेंच्या घरातून कोण हा प्रश्न गौण आहे. विक्रम पाचपुते यांची उमेदवारी अंतिम मानली जात असताना विक्रम पाचपुते हे जाहीरपणे कोणतेही भाष्य करताना दिसत नाहीत. दुसरीकडे शरद पवारांनी स्वत: माजी आमदार राहुल जगताप यांची उमेदवारी अंतिम केल्यानंतर तुतारी चिन्ह हाती घेत मैदानात उतरण्यास सज्ज झालेले राहुल जगताप हे कमालीचा संयम बाळगून आहेत. त्यांची ही संयमी भूमिकाच त्यांच्याच स्वकीयांसह मविआतील मित्रपक्षातील तालुक्यातील नेत्यांना गोंधळात टाकत आहे. २०१४ मध्ये आमदारकी मिळाल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत थांबून घेतलेल्या राहुल जगताप यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत लढायचे असं ठरवलं. त्याआधी तालुकास्तरावरील बाजार समिती, खरेदी विक्री संघ आदी महत्वाच्या संस्था ताब्यात घेतल्या! त्यात निर्णायक भूमिका घेत आपली ताकद निर्माण करताना जिल्हा बँकेत देखील ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून मोठी ऑफर असतानाही राहुल जगताप यांनी शरद पवार यांच्याच सोबत राहणे पसंत केले. अजित पवार यांच्याकडून थेट आलेली ऑफर देखील त्यांनी नाकारली. त्यातूनच विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाही कोठेही फारशी आदळआपट न करता त्यांच्या उमेदवारीचे संकेत स्वत: शरद पवार यांनी दिले. पवारांनी संकेत दिल्यानंतर व कामाला लागा असे स्पष्ट केल्यानंतरही राहुल जगताप यांनी त्याचा फार डांगोरा पिटवला नाही! मात्र, दुसरीकडे त्याच महा विकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेच्या इच्छुकांनी ‘उमेदवारी आपल्यालाच’ असा डांगोरा पिटवला! आजही तोच डांगोरा चालू आहे.

राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे हे दोघेही सध्यातरी अजित पवार गटासोबत आहेत. मात्र, असे असले तरी ही जागा भाजपाकडे आहे. विधानसभा लढायचीच असा चंग त्यांनी बांधला असताना त्यांना पहिला पर्याय आहे तो महाविकास आघाडीचा! त्यातही शरद पवार गटाचा! पवारांनी नाकारले तर काँग्रेसचा आणि त्यांनीही नाकारले तर शिवसेनेचा! मात्र, ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोणत्याही परिस्थितीत सोडली जाण्याची शक्यता नाही. याशिवाय राहुल जगताप अडचणीच्या कालावधीत सोबत राहिले असल्याची मोठी पावती जगताप यांच्याकडे आहे. जगताप यांच्या उमेदवारीला स्पर्धक असलेल्या नागवडे यांनी काँग्रेस- भाजपा- काँग्रेस- राष्ट्रवादी अजित पवार गट असा प्रवास केलाय आणि असाच प्रवास घनश्याम शेलार या दुसर्‍या स्पर्धकाचा राहिलाय! त्यामुळेच एकनिष्ठतेच्या मुद्यावर राहुल जगताप हेच उजवे ठरले आहेत. उमेदवारी अंतिम असतानाही हेच राहुल जगताप कोणाच्याही विरोधात शब्द बोलताना दिसत नाहीत आणि दुसरीकडे नागवडे- शेलार यांनी रान पेटवून दिले आहे. उथळ पाण्याला खळखळाट असतोच पण, तो किती असावा यालाही मर्यादा आहेत. नागवडे- शेलार यांचं गणित येथेच चुकलंय असा निष्कर्ष निघण्यास यातून वाव मिळतोय!

इच्छुक काँग्रेसकडून अन् मागणी शरद पवारांकडे!
उमेदवारीची मागणी करताना स्वत:च्या नेत्याकडे आणि पक्षाकडे मागणी करायची सोडून काँग्रेसचे इच्छुक घनश्याम शेलार यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे न जाता शरद पवार यांना गाठले. त्याच पवारांनी दोन महिन्यांपूर्वी श्रीगोंद्यातील एका कार्यक्रमात याच घनश्याम शेलार यांना कसे टाळले हे सर्वश्रूत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या घनश्याम शेलार यांनी यावेळी आपण लढणार असं जाहीर केले. मात्र,त्यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्ष अथवा पक्षाच्या नेत्यांकडे मागणी न करता थेट शरद पवार यांना गाठले. इच्छुक असल्याचे सांगताच पवार यांनी, ‘ही मागणी तुम्ही काँग्रेसकडे करा’, असं स्पष्ट केले.

बीआरएस हीच घनश्याम अण्णांची मोठी घोडचूक!
मागील निवडणुकीत शरद पवार यांच्या घड्याळ चिन्हावर जवळपास एक लाख मतांच्या आकड्यापर्यंत पोहोचल्यानंतर अत्यंत कमी मताने पराभूत झालेल्या घनश्याम शेलार यांनी जनसंपर्क कमी केला नाही. पायाला भिंगरी बांधल्यागत ते या पाच वर्षात जनतेच्या सुखदु:खात सहभागी झाले. मात्र, लोकसभेआधी त्यांना ‘बीआरएस’ची अवदसा आठवली. तीच त्यांची मोठी घोडचूक ठरली. त्यावेळी त्यांनी बीआरएसची वाट धरली नसती तर आज घनश्याम शेलार हेच तुतारीचे उमेदवार असते आणि त्यांची घोषणा महिनाभर आधीच झाली असती. काँग्रेसपक्षात प्रवेश केल्यानंतरही त्यांच्या पदरात यावेळी काहीच पडणार नाही अशी परिस्थिती आहे. मविआ सोबत राहणे आणि उमेदवाराला निवडून आणणे हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर सध्यातरी दिसतोय. त्याच्या बदल्यात पुढे पदरात मिळेल ते घेणे इतकेच काय ते बाकी दिसतेय!

कोण खेळतंय पडद्याआड सूत्रे हलवून सोयीचा डाव मांडण्याची जुनी खेळी?
भाजपाचा उमेदवार अंतिम असताना महाविकास आघाडीशी काहीही संबंध नसताना त्या आघाडीत एकापेक्षा अनेक इच्छुक करण्यासाठीचा डाव टाकला गेल्याची चर्चा आहे. आपल्याला जे पाहिजे ते सरळ मिळत नसेल तर सोबतीला असणार्‍यांना झुंझवायचं आणि आपल्याला हवं ते मिळवायचं ही जुनी खेळी खेळणारा कोण हे आता तालुक्यातील जनतेने ओळखल्याची चर्चा आहे. मतदारसंघात विक्रम पाचपुते आणि राहुल जगताप यांच्यात अंतिम सामना रंगणार असल्याचे माहिती असूनही जगताप यांच्या वाटेत पडद्याआड राहून काटे पेरले जात असल्याचे लपून राहिलेले नाही. अडीच वर्षापूर्वी कारखाना निवडणुकीत भोस यांनी राजकीय सन्यास घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, असे असताना आता हेच बाबासाहेब भोस हे मी देखील लढणार असं सांगत सुटले आहेत. पवार लाटेचा त्यांना फायदा घ्यायचा आहे की त्यांना अशी भूमिका घेण्यास कोणे भाग पाडत आहे का असा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आला आहे. भोस यांचं ऐनवेळी इच्छुक होणं म्हणजेच त्यांना कोणतरी बोट लावलं आहे आणि हे बोट कुणी लावलं हे सर्वश्रूत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...