Manoj Jarange Patil: आम्हाला राजकारणामध्ये पडायचे नाही, मात्र आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, आरक्षण मिळाले नाही तर आमच्यासमोर पर्याय काय? त्यामुळे नाईलाजाने आम्ही २८८ पाडायचे की उभे करायचे याबाबत निर्णय घेणार आहोत,असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करावी. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज शुक्रवार दि. २६ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले,अजून सरकारचे बोलणे झाले नाही. पावसामुळे सरकार बिझी आहे, जनतेच्या कामात व्यस्त आहे. आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही पाडापाडी करणार आहोत. सरकारमुळे आमचा नाईलाज झाला असून 29 ऑगस्ट रोजी 288 लढायचे की पाडायचे हे ठरवणार आहे, सर्व समाज एकत्र होणार आहे,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“गोर-गरीब मराठ्यांना मोठे करायचे असेल तर सर्वसामान्य माणसाची लढाई लढणार आहे. 29 ऑगस्ट रोजी भूमिका जाहीर करू, 14 ते 20 ऑगस्ट उमेदवारांची यादी करू. 20 ते 27 ऑगस्टला या यादीवर चर्चा करू आणि 29 ऑगस्ट रोजी काय करायचे ते ठरवू,असे म्हणत, “तुम्ही जर आम्हाला डिवचले तर आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.
“मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे की नाही, याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जर विरोधक आपली भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा, वाट पाहू नये,” असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांच्या भाषणाचा व्हिडिओ दाखवत विरोधकांनाही सवाल केला.