रस्त्यांवर अर्धाफुट पाणी; नगरकरांची अक्षरश: त्रेधातिरपीट
अहमदनगर | नगर सह्याद्री
मागील रविवारपासून अवकाळीचा तडाखा जिल्ह्याला बसत आहे. शुक्रवारी (दि. १) नगर शहरासह जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शहरात सावेडी उपनगरासह केडगावात मुसळधार पाऊस झाला. भिंगार, नागापूर परिसरात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. नेवासे, नगर, पारनेर, श्रीगोंदे, शेवगाव तालुयांतही जोरदार पाऊस झाला.
नगर शहरात मागील आठवड्यात रोज पाऊस झोडपून काढत आहे. रात्री उशीरा येणार्या पावसाने शुक्रवारी मात्र संध्याकाळीच हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी उन्हाचा चटका वाढला होता. सायंकाळनंतर आभाळ भरून आले, वारा सुटला आणि टपोर्या थेंबासह पाऊस सुरू झाला. अवघ्या काही क्षणातच सर्वत्र पाणीपाणी केले. शहरातील बहुतांश भागाला जवळपास पाऊण तास पावसाने अक्षरशः झोडपून काढले. कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघालेल्या नोकरदारांची आडोशाचा आधार शोधता शोधता त्रेधातिरपीट उडाली. काही वसाहतींमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली.
जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी
नेवासे तालुयात सर्वाधिक ११.८ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल नगर तालुयात ९ मिमी पावसाची नोंद झाली. पारनेर २.४, श्रीगोंदे ७.४, कर्जत ४.३, शेवगाव ३.१, पाथर्डी ८.६, राहाता १.५ मिमी पावसाची नोंद झाली.
पंचनामे रखडले
अवकाळीने शेतीचे प्रचंड नुकसान केले. जिल्ह्यात ३६ हजार शेतकर्यांना अवकाळीचा फटका बसला. ४२ हजार हेटर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे काम सुरु असताना गुरुवारी व शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पंचनाम्याची कामे थांबली आहे
शहरातील रस्त्यांवर अर्धा फूट पाणी
शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सावेडी भागातील प्रोफेसर कॉलनी चौक, पारिजात चौक, कोहिनुर मंगलकार्यालय रस्ता, दिल्ली गेटसह शहरातील आदी भागांत रस्त्यांवर साधणार अर्धा फूट पाणी साचले होते.