अहमदनगर। नगर सहयाद्री-
नेवासा येथील श्री काशी विश्वेश्वर देवस्थानची दानपेटी फोडून ८ ते १० हजार रुपयांच्या रकमेची चोरी झाल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकणी महेश अशोक गोंजारी (रा नेवासा बुद्रुक) याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले आहे.
याबाबत मंदिराचे विश्वस्त संतोष हिरामण कुंहारे (धंदा- शेती रा. कोर्ट गल्ली नेवासा खुर्द ) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, आमची मंदिर समितीची १० जून २०२४ रोजी बैठक न झाल्याने मंदिरातील दानपेटी उघडलेली नव्हती. २४ जून रोजी रात्री ९.३० वा. मी घरी असताना मला मंदीराचा साफसफाई करणारा दत्ता नरसु लष्करे यांचा फोन आला की, काशीविश्वेश्वर मंदिरात चोरी झालेली आहे.
मी, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नरसू शेटीबा लष्करे, सचिव अॅड. संजीव तुकाराम शिंदे, विश्वस्त लक्ष्मण देशपांडे व साफसफाईचे काम करणारे सचिन गरुटे, कमलेश लचुरे यांचे सोबत मंदीरात जावून पाहिले असता मुख्य गाभाऱ्यातील दानपेटीचे लॉक तोडून त्यातील रक्कम, तसेच मंदिराच्या आवारातील शनिदेव व मारुती यांच्या चौथऱ्यावरील दोन दानपेट्या यांचे लॉक तोडून त्यातील रक्कम चोरी गेल्याचे आमच्या निदर्शनास आले.
मंदिराचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंदिराच्या दानपेटीतील पैशांची चोरी करत असताना महेश अशोक गोंजारी (रा नेवासा बुद्रुक) हा असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला घरातून ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या समक्ष हजर केले असता त्याने दानपेट्यांतील पैशांची चोरी केल्याची कबुली दिली.सदर गुन्ह्यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.