कोल्हापुर / नगर सह्याद्री –
कोल्हापुरमध्ये गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोल्हापुरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूराचे पाणी गावांमध्ये शिरले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील ८६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापुरमधील पूरसदृश्य परिस्थिती लक्षात घेता एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
कोल्हापुरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. कोल्हापूर शहरात नदीचे पाणी आले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. पंचगंगा नदी परिसरात असलेल्या गायकवाड वाडा परिसरात रात्री नदीचे पाणी शिरले. त्यामुळे या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहे. सध्या कोल्हापूर – रत्नागिरी, कोल्हापूर – गगनबावडा या राज्य मार्गावर नदीचे पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरु आसलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथक देखील सतर्क झाले आहे. रविवारी सायंकाळी प्रयाग -चिखली, आंबेवाडी या गावाना एनडीआरएफच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती ओढवल्यास नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी एनडीआरएफ आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील बाजार भोगाव गावातील बाजार पेठेत नदीचे पाणी शिरले आहे. बाजार भोगाव परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचसोबत नदीचे पाणी आल्यामुळे बाजार भोगावमधील व्यापार पेठ बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ८६ बंधारे पाण्याखाली गेली आहेत. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील राजाराम बंधारा ३८ टक्के, राधानगरी धरण ८० टक्के भरले आहे.
दरम्यान, कोल्हापुरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहणाऱ्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी ९२०९२६९९९५ हा मोबाईल क्रमांक कोल्हापूर हेल्पलाईन म्हणून सेव्ह करावा. व्हॉटसअपवरून या नंबर वर १ ते ६ पैकी क्रमांक मेसेज करावेत. पाऊस, धरण पाणी पातळी, रस्ते, इत्यादी बाबतची सर्व माहिती तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल.