अहमदनगर। नगर सहयाद्री
वॉचमनचे हातपाय बांधून शोरूममधून चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. प्रविण श्रीधर काळे (वय २४, रा. भेंडाळा, ता. गंगापूर), ज्ञानेश्वर मनोहर जाधव (वय २८) व संतोष अशोक कांबळे (वय २३, दोन्ही रा. वाळुंज, ता. गंगापूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांकडून १० एलईडी टीव्ही जप्त करण्यात आल्या आहेत.
अधिक माहिती अशी : सोपान भिकाजी शिकारे (रा.धनगरवाडी, जेऊर) यांच्या धनगरवाडी येथील शुभम ट्रेडर्स शोरूम मध्ये १९ मार्च रोजी आरोपींची मागील बाजूने प्रवेश केला. कामगार बाबुलाल राजभर याचे हातपाय पॅकिंग पट्टयांनी बांधून मारहाण करत १ लाख ५५ हजार रुपयांचे पीएचएस, सॅमसंग कंपनीचे १७ एलईडी व तांब्या पितळाचे भांडे बळजबरीने चोरुन नेले होते. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, आकाश काळे, देवेंद्र शेलार, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे व संभाजी कोतकर आदींचे पथक नेमून कार्यवाही सुरु केली.
हा गुन्हा आरोपी प्रविण काळे याने केल्याचे पोलिसांना समजले. तो चोरीचा माल विकण्यास नगर – छत्रपती संभाजीनगर रोडवरील पंढरीपूल येथे साथीदारांसह येणार आहे अशी माहिती समजली. पोलिसांनी सापळा लावत वरील आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख २६ हजारांचे पीएचएस कंपनीचे ३२ इंची ९ एलईडी, १४ हजारांचे ३२ इंची एलईडी, ४ लाखांची फोर्ड फियागो कंपनीची गाडी असा ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलीस करत आहेत.