मुंबई | नगर सह्याद्री:-
राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्या अगोदर महायुतीने पत्रकार परिषद घेऊन सरकारचं रिपोर्ट कार्ड जनतेसमोर सादर केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना आव्हान देत आधी महाविकास आघाडीने चेहरा सांगावा असे म्हटले होते. त्यालाच आता शरद पवारांनी सूचक विधान करत फडणवीसांच्या आव्हानाला उत्तर दिले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेेल असे विधान पवार यांनी केल्याने पाटील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आणि राजकीयदृष्ट्याहींराज्याने प्रगती करण्यासाठी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्राचा कारभार चुकीच्या हातांमध्ये आहे. त्याचा फटका सगळ्या राज्याला बसला आहे. महाराष्ट्राची जी प्रतिमा महायुतीमुळे मलीन झाली आहे ती सुधारण्याची आवश्यकता आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात जसा महाराष्ट्र होता तसा महाराष्ट्र घडवण्याची आवश्यकता आहे. राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करु शकतात याची मला खात्री आहे. असं शरद पवार यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपाच्या भाषणात म्हटलं. त्यामुळे जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का? या चर्चा सुरु झाल्या आहेत.
शरद पवार पुढे म्हणाले, जयंत पाटील यांनी सात हजार किमीची शिवस्वराज्य यात्रा काढली. तसंच ते सुमारे 76 मतदारसंघांमध्ये गेले होते. आपलं राज्य विकासाच्या बाबतीत खालच्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे. जयंत पाटील यांनी राज्याचा दौरा केला आणि त्यांनी लोकांमद्ये आशा पल्लवित केल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी खात्री आहे की ते महाराष्ट्राला योग्य दिशा देतील.मतदारांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीत जागा दाखवून दिली. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सरकारने मग विविध योजना आणल्या. लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान केल्याचं महायुतीने सांगितलं पण महिला सुरक्षेचं काय? कारण अत्याचारांच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत असं शरद पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, महायुतीचे रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं आहे. फडणवीस म्हणाले, सत्ता पक्षाला कुठलीही चिंता नाही. मुख्यमंत्री स्वतःच इथे आमच्याबरोबर बसले आहेत. त्यांना विचारा तुमचा चेहरा कोण. माझं शरद पवारांना खुलं आव्हान आहे शरद पवारांनी तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ते सांगा? असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्यानंतर शरद पवारांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांनी फडणवीसांचं आव्हान स्वीकारल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.