Politics News: लोकसभा निवडणुकीत राज्यात दणदणीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभेसाठी पुन्हा रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. तर आता लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महायुती देखील तयारीला लागली आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्मुला जवळपास निश्चित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना १०० जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर काँग्रेस देखील १०० जागांवर उमेदवार उभे करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ८४ जागा मिळाल्या आहेत, तर उर्वरित चार जागा मित्रपक्षांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यासोबत विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा निवडणुकीतही राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी बाजी मारली होती. आता ही निवडणूक देखील चांगल्या प्रकारे पार पडवी आणि लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील चांगला मतांनी विजय मिळवता यावा यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
आगामी विधानसभा तीन पक्ष मिळून लढवणार
आगामी विधानसभा निवडणूक तीन पक्ष मिळून लढणार आहेत. तीन पक्ष एकत्र लढतात असतात त्यावेळी कुठल्याही एका जागेवर तिघांपैकी कुणी ती लढवावी याबाबतचा निर्णय आणि एकवाक्यता करावी लागते. ती प्रक्रिया सुरु आहे. तिन्ही पक्षांचे नेते गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत बसत आहेत. जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर तो तो पक्ष तिथं कोण उमेदवार द्यायचा विचार करेल. आम्ही तीन पक्ष एकत्र बैठक घेणार आहोत. असं शरद पवार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं आहे.