नगर सह्याद्री / मुंबई : राज्यातील महायुती सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून छगन भुजबळ यांना वेळीच सामावून सांगा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, शिंदे गटानेही भुजबळांच्या वक्तव्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली.
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, याचा विचार सरकारने केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी काल (सोमवारी) केलेलं विधान विधान आश्चर्यकारक असल्याचं शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. तसंच अजित पवार यांनी छगन भुजबळांना समज द्यावी, असं देखील शंभुराजे देसाई यांनी म्हटलं आहे.
शंभूराजे देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली. भुजबळांच्या वक्तव्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात जाती-जमातींमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे भुजबळ यांचे वक्तव्य आहे व ते चुकीचे आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती आणखी बिघडू शकते. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहोत. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल, असे देसाई यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांचे वक्तव्य बिलकुल योग्य नाही. आपलं म्हणणं त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडायला हवं, असे माध्यमांवर बोलू नये. भडक वक्तव्ये करणारी भूमिका भुजबळ यांची नेहमीची असते. पण आता त्यांनी असे करू नये. अजितदादा यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. आम्ही अजितदादांना उद्या भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की अशी वक्तव्य करू नये, अशी आक्रमक भूमिका शंभूराज देसाई यांनी घेतली.
छगन भुजबळ काय म्हणाले होते?
मंत्री छगन भुजबळ सोमवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जाळपोळीची पाहणी केली. परतीच्या प्रवासात त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारच्या शिंदे समितीवर आमचा आक्षेप आहे. माजी न्यायाधीश जरांगे यांना भेटायला जातात हे चुकीचे आहे. आमचे मंत्री, आमदार जरांगें यांना भेटायला जात आहेत त्यांना ओबीसींचे मत नको का? गुन्हे मागे घेण्याची आणि खटले मागे घेण्याची मागणी करणे योग्य नाही, असे भुजबळ म्हणाले.