श्रीगोंदा | नगर सह्याद्री-
शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या होस्टेल वर राहणार्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. शहरातील शाळकरी, अल्पवयीन मुला-मुलींना आर्थिक फायद्यासाठी लॉजिंग चालक रूम देत असल्याने अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात सहकार्य करणार्या लॉज चालकांना सहआरोपी करावे या मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मीरा शिंदे, महिला दक्षता समितीच्या डॉ. सुवर्णा होले, सुनिता पलीवाल, चांदणी खेतमाळीस, शाहिदा मणियार, शांताबाई चौघुले, मीरा खेंडके, राजश्री शिंदे, वर्षा कापसे आदीसह महीला उपस्थित होत्या.
शहरातील एका लॉजिंगवर अल्पवयीन शाळकरी मुलींवर अत्याचार झाल्याची निंदनीय घटना घडली. तालुक्यातील लॉजिंगवर या आधी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत. परंतु केवळ इज्जतीला भिऊन व मुलींचे भवितव्याचा विचार करून गुन्हे दाखल झाले नाहीत. लॉज चालक सर्व नियम धाब्यावर बसवून आपला आर्थिक फायदा पाहत आहेत. त्यामुळे संबंधित गुन्हेगारास सहकार्य केल्यामुळे लॉज मालक-चालकास सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.