संगमनेर। नगर सहयाद्री-
मराठा समाजाचा आरक्षणाच्या मुद्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार का? असा सवाल अनेकांना पडला आहे. त्यातच भाजप नेते गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून एक मोठं विधान केलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा करत मोठी आदोलने उभारली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
१ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरु करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं असुन २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला मुदत दिली आहे.
दरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांनी कुठल्या कायद्यानुसार सरसकट आरक्षण देणार? असा सवाल केला आहे. ते संगमनेरमध्ये बोलत होते.
काय म्हणाले गिरीश महाजन?
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, या संदर्भात आम्ही सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टातून याचा मार्ग निघणार आहे.
मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते. तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणं शक्य नाही, हे मी त्यावेळीच सांगितलं होतं.
मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात सरकार यशस्वी ठरेल. जेवढ्या लोकांच्या नोंदी सापडल्या आहे, त्यांना सरकार कुणबीचा दाखला देत आहे. पण कुठल्या कायद्यानुसार देणार? हा मोठा प्रश्न आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.
मराठा समाजाची दिशाभूल करू नका: मनोज जरांगे यांचा गिरीश महाजन यांना इशारा
गेल्या काही दिवासांपासून राज्यात मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणं शय नाही, ज्यांच्या नोंदी त्यांनाच प्रमाणपत्र दिले जाईल, असे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चुकीची वक्तव्य करुन मराठा समाजाची दिशाभूल करु नये, अन्यथा आम्ही आश्वासनाच्या क्लिप राज्यभर व्हायरल करु असा इशारा जरांगे पाटील यांनी गिरीष महाजन यांना दिला.
मनोज जरांगे पाटील सध्या खानदेश दौर्यावर आहे. ते म्हणाले, गिरीश महाजन यांनी विचार करावा आणि नंतर वक्तव्ये करावीत. त्यांनी आपली मागणी पूर्ण करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर त्यांना आपण वेळ दिला होता. आमच्याकडे त्यांनी दिलेल्या आश्वासनाचे अनेक पुरावे आहेत. १७ डिसेंबरला आम्ही बैठक घेणार आहे.
राज्यभरातून सर्व मराठा अंतरवाली सराटे येथे येणार आहे. सरकारला अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा अशी विनंती करणार आहे. अजूनही मराठा आंदोलक बांधवांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत. सरकरने सांगितले होत की गुन्हे दाखल करणार नाही तरी देखील गुन्हे दाखल करून लोकांना अटक करण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालवे. गुन्हे दाखल करणे थांबवा नाहीतर तुम्हाला जड जाईल, असा इशारा दिला.