अहमदनगर । नगर सहयाद्री:-
पुण्याच्या एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये तरुणाई ड्रग्सचे सेवन करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नगर शहर व लगतच्या तालुका परिसरातील हायवे लगत असणार्या महाविद्यालय परिसरात रात्री उशिरापर्यंत परमिट रूम, बिअर शॉपी सुरू असतात. या ठिकाणी महाविद्यालयीन युवक, युवतींना मद्य सेवनाचे परवाने नसताना देखील सर्रासपणे मद्य विक्री केली जाते. या ठिकाणी केवळ मद्यच विक्री होते की ड्रग्स देखील उपलब्ध करून दिले जातात? हुक्का पार्लर देखील या ठिकाणी चालविले जातात अशी चर्चा आहे. पुणे ड्रग्स प्रकरणाची पुनरावृत्ती नगरमध्ये होऊ नये यासाठी काय प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस, एसाईज विभाग करत आहे? नगरच्या हद्दीतून गांजा तस्करी होत आहे. गृह विभाग, एसाईज विभाग काय दिवे लावत आहे? असा संतप्त सवाल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे.
शहर काँग्रेसने गृहमंत्री फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क (एसाईज) विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना याबाबत लेखी निवेदन पाठवून कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे.नगर शहर व लगत असणार्या महाविद्यालयांच्या परिसरातील तरुणाई नशेच्या विळख्यात सापडली आहे. शहरातील नगर कॉलेज, तसेच त्या जवळ अन्य दोन-तीन महाविद्यालय आहेत. तसेच विळद घाटात देखील मोठे शैक्षणिक संकुल आहे.
शहराच्या अन्य परिसरातील महाविद्यालयां लगत असणार्या भागात देखील हीच परिस्थिती आहे. महाविद्यालयां लगत असणार्या विविध ठिकाणी अवैधरित्या दारू, बियर विकली जाते. परवानाधारक परमिट रूम, बियर बार रात्री नियमाचे उल्लंघन करून उशिरापर्यंत सुरू असतात. या प्रकारांवर राज्य उत्पादन शुल्क (एसाईज) विभागाने याबाबत कठोर पावले उचलून योग्य ती कारवाई केली नाही तर जिल्हाध्यक्ष काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी दिला आहे.
कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे
अहमदनगर शहरात कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट उपलब्ध करून तिथे शालेय विद्यार्थ्यांसह कॉलेज विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सोय करण्यात येते. यामुळे तरुण पिढी नको त्या गोष्टींना बळी पडत आहे. यामुळे पालक देखील चिंतित आहेत. अशा अवैद्य कॅफेंवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची काँग्रेसने मागणी केली आहे.