अहमदनगर | नगर सह्याद्री
तरूणाने अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे लक्ष्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नगर शहरात राहणार्या पीडित अल्पवयीन मुलीने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द अत्याचार, पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा तपासकामी तोफखाना पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. राजेश अंबादास कस्तुरी (रा. जाधव मळा, बालिकाश्रम रस्ता, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
नगर शहरात राहणार्या अल्पवयीन मुलीची राजेश सोबत ओळख झाली. ते दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी बोलत होते. ते बोलणे मुलीच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी राजेशच्या घरी जावून त्यांना सांगितले होते. त्यानंतर राजेश मुलीसोबत काही दिवस बोलत नव्हता. पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर राजेशने मुलीला मोबाईल दिला होता. त्या मोबाईलवरून मुलगी राजेश सोबत बोलत होती. राजेशने तिला लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतरही त्याने तीन ते चार वेळा मुलीला लॉजवर नेले व तिच्यावर अत्याचार केला. मासिक पाळी न आल्याने मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर पीडिताने नातेवाईकांसह पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजेश कस्तुरी विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे करत आहेत.