श्रीगोंदा / नगर सह्याद्री –
श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा ७० वा वाढदिवस दि.९ सप्टेंबर रोजी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त आमदार पाचपुते हे श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी हितगुज साधणार असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी माऊली निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्या समवेत भाजप तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र उकांडे हे उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त मोठ्या मेळाव्या ऐवजी जनता कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागील कारण विशद करताना विक्रम सिंह पाचपुते म्हणाले की मोठे मेळाव्यात व्यासपीठावरून विचार मांडण्यात येतो. त्यात कार्यकर्ते व जनता यांच्याशी थेट संवाद साधला जात नाही. आणि आमदार बबनराव पाचपुते नेहमी लोकांच्या सहवासात आणि प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेत असल्याने गेल्या दोन वर्षापासून मेळाव्या ऐवजी जनता कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे . निवडणूक जवळ आल्याने भविष्यात मेळावा घेण्यात येणार आहे असे सांगून गेले वर्षभरात आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याने त्यांचे दौरे वाढले असून विकास कामे देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याने जनता आणि कार्यकर्ते पाचपुते यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. आमदार पाचपुते जनता आणि कार्यकर्त्यांना भेटून हितगुज करणार असल्याचे सांगून या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करतानाच पाचपुते यांनी निवडणुकीत आमच्या कुटुंबातील कोण उभे राहणार हे जनता आणि कार्यकर्ते आणि पक्ष श्रेष्ठी ठरवतील असे सांगत मतदार संघात उत्तर दक्षिण रस्त्याच्या तुलनेत पूर्व पश्चिम रस्त्यांची संख्या कमी होती पूर्व पश्चिम रस्ते मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. त्यामुळे लोकांचा वेळ आणि इंधन बचत झाली. एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला, मुस्लिम समाजाच्या सभागृहासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असे सांगून पाचपुते कुटुंब मतदार संघात विकासाचे काम करण्यास प्राधान्य देत याचा पुनर्विचार केला.
बबनराव पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी १० ते २ या वेळेत काष्टी येथील आमदार पाचपुते यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टी, वैद्यकीय आघाडी श्रीगोंदा व इंडियन मेडिकल प्रॅक्टिशनर असोशियन जिल्हा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी केले आहे.