मुंबई / नगर सह्याद्री
मराठा आरक्षणाची मागणी सोडविण्यासाठी राज्य सरकारने आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आणखी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. त्यानुसार जरांगे यांनी सरकारला उपोषण मागे घेतल्यानंतर अल्टिमेटमही दिला आहे.
तर दुसरीकडे मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले असून ओबीसी समाजाचे नेते आक्रमक होत आहेत. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे पाटील यांनीही छत्रपती संभाजीनगर भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. समानता निर्माण करण्यासाठी आहे. ७० वर्षांच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाले असून अजूनही समाज मागासच आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण सरसकट ओबीसीतून नको, तर स्वतंत्र आरक्षण द्या, असा एल्गार ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. ते आज सकाळी छत्रपती संभाजीनगरहून -बीडकडे जात असताना अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या महामार्गावरील वडीगोद्री येथे बोलत होते.
यानंतर मनोज जरांगे यांना विचारले असता भुजबळांना भेटण्याचा काही संबंध नाही. पण, मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी बोलणार नाही. आरक्षणावर कोणी बोलत असेल तर मी सोडणार नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
१७ नोव्हेंबरला ओबीसींचा मोर्चा
मंत्री छगन भुजबळ यांनी दोदडगाव येथील मंडल स्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर वडीगोद्री येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, १७ तारखेला जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसीच्या महामोर्चाचे आयोजन केले असून सर्वांनी एकत्र यावे. निमंत्रणाची वाट न पाहता मोर्चाला या. सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन उपोषण, मोर्चे काढून एका आवाजात उभे राहावे लागेल. नाहीतर आपल्या लेकरा-बाळांचे भवितव्य धोक्यात येईल, असेही भुजबळ यांनी म्हटले.