छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री
मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत अनेकांनी आपापली मते मंडळी आहेत. आता प्रसिद्ध बागेश्वर बाबांनी याबाबत आपले वक्तव्य केले आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे आपल्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. बागेश्वर बाबा सध्या देशभरात अनेक ठिकाणी दिव्य दरबार भरवत आहेत. हजारो भाविक तेथे येत असतात. आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले.मराठा समाजाला आरक्षण मिळावे का असा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना बागेश्वर बाबा म्हणाले की, देश गुलामीत होता. त्या कठीण परिस्थितीत ज्या शूरवीरांनी आपली भारतमाता गुलामीतून मुक्त करण्यासाठी मोठा लढा दिला, त्यात सर्वाधिक योगदान मराठा समाजाचे होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी बागेश्वर पीठाची मागणी आहे. सरकारला आवाहन करतो की, त्यांनी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशा शब्दात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मराठा आंदोलनास पाठिंबा दिला.