नगर सह्याद्री / संगमेनर : कांद्याचे भाव जवळपास साडेचार हजारांपर्यंत गेला होता. शेतकऱ्यांना कुठे आर्थिक स्थिरतेची आशा दिसू लागली होती. परंतु आता पुन्हा एकदा कांद्याचे भाव कोसळले आहेत. कांदा एकाच दिवसात जवळपास दोन हजारांनी कोसळले आहेत. शुक्रवारी कांद्याला २००० रुपयांपर्यंत भाव आले होते.
निर्यातबंदी
केंद्र शासनाने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी लागू केली आहे. कांद्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. परंतु याने मात्र नगर, नाशिक जिल्ह्यासह राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
शेतकरी संतप्त
कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी संतप्त झाले होते. मनमाड, लासलगावसह अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव झालेले नाहीत. अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले. संगमनेरबाजार समितीत देखील शेतकरी संतप्त झाले होते. कांद्याचे भाव अचानक कोसळल्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिक-पुणे मार्ग अडवला. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सुमारे दीड तास शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन याठिकाणी केले होते. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. अखेर संगमनेर बाजार समितीच्या सभापतींनी फेर लिलाव करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
भाव वाढवत नाही तोपर्यंत लिलाव बंद
जोपर्यंत केंद्र सरकार कांद्याचे भाव वाढवत नाही तोपर्यंत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार असून शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीमध्ये न आणण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी केले.