नीलेश लंकेंची द्वीधा अवस्था | आमदारकी वाचवायची धडपड | कार्यकर्ते म्हणताहेत; राणीताई नको, नेते तुम्ही लढा!
शिवाजी शिर्के | नगर सह्याद्री
लोकसभेच्या नगर मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच सुजय विखे पाटील यांनी भेटीगाठीचं सत्र जोरकसपणे सुरु केल्याचे समोर येत आहे. त्याचवेळी अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या गोटात जवळपास दाखल झाल्यात जमा असलेल्या पारनेरच्या निलेश लंके यांना धडा शिकवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अॅक्टीव्ह झाल्याचे दिसून येत आहेत.
सुजय विखे पाटलांनी मंगळवारी अजित पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोघांत चर्चा झाली. पवार- विखे कुटुंबातील संघर्ष सर्वश्रूत! दोन्ही कुटुंबातून विस्तवही जात नसताना अजित पवार यांनी सुजय विखे पाटलांसोबत केलेली चर्चा, त्यांच्या प्रचारार्थ नगरला येण्याचा दिलेला शब्द, पारनेरला जाहीर सभा घेण्याबाबत केलेले सुतोवाच अन् गुलाल घेण्याच्या दिलेल्या शुभेच्छा सुजय विखे पाटलांना बळ देणार्या ठरल्या असताना दुसरीकडे निलेश लंके यांच्यासाठी आता त्या धोक्याच्या समजल्या जात आहेत.
भाजपाने नगर मतदारसंघातून विद्यमान खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली अन् ते तयारीलाही लागले. दुसरीकडे शरद पवार गटाकडून पारनेरचे आ. निलेश लंके यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असतानाही त्यांची द्वीधा अवस्था झाली असल्याचे समोर येत आहे. लढायचं तर आहे पण सोबतीने आमदारकीही वाचवायची अशा अवस्थेत असणार्या आ. लंके यांना कार्यकर्त्यांसह विखे विरोधकांनी घोड्यावर बसवले असल्याचे आता लपून राहिलेले नाही.
आ. लंके हे त्यांच्या पत्नी सौ. राणीताई यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीचा तपशिल समजला नसला तरी शरद पवार यांनी राणीताई लंके यांच्या नावास अनुकुलता दर्शवली नसल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान,मी अजितदादांसोबत अन् शरद पवार साहेबांसोबत असे सांगत गेल्या आठ दिवसात सस्पेंन्स निर्माण करणार्या आ. लंके यांना अजित पवार यांनी पहिला शॉक दिल्याचे बोलले जाते. अनेक वर्षांपासून विखे- पवार या कुटुंबात संघर्ष! मात्र, सुजय विखे यांनी पुढाकार घेतला अन् अजित पवार यांनी त्यांना प्रतिसाद दिला! सुजय, तुझ्यासाठी नगरला येणार आणि तुझ्यावर गुलाल टाकणार असा शब्द अजित पवार यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडल्यात जमा आहे. त्यानंतर आता सुजय विखे पाटील यांची भेट नगर दक्षिण मतदारसंघासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. पवार आणि विखे कुटुंबात विस्तवही जात नसताना पुढच्या पिढीची ही भेटगाठ महत्त्वाची मानली जाते. लोकसभा लढण्याची लंके यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. लंके स्वत: की त्यांच्या पत्नी एव्हढाच निर्णय बाकी आहे. याचाच अर्थ आ. लंके हे सध्यातरी द्वीधा अवस्थेत आले आहेत.
निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडली, मात्र अद्याप शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला नाही. काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रवेश रखडला असल्याची माहिती आहे. परंतु लोकसभा लढवण्याची तयारी त्यांनी पूर्ण केली आहे. याच दरम्यान शरद पवार आणि लंकेंच्या चर्चा जोरावर असताना विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. कुकडी आवर्तन आणि श्रीगोंदा- कर्जतचा पाणी प्रश्न यावर चर्चा झाल्याचे सुजय विखे यांनी ट्वीट द्वारे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात ही चर्चा लोकसभेच्या नगर मतदारसंघातील एकूण आढाव्याचीच राहिली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले या बैठकीचे साक्षीदार ठरले.
कार्यकर्त्यांनो सावधान! सोश
माफीनाम्यावर लंकेंनी विखेंना पुन्हा डिवचले!
भाजपा कार्यक्रमातील बैठकीत सुजय विखे यांनी आपल्याकडून कोणी दुखावले गेले असल्यास माफी मागतो असं विधान केलं होतं. यावर बोलताना आ. लंके यांनी विखे यांना पुन्हा डिवचले. ते म्हणाले, ‘जिल्ह्यातील स्वयंभू नेते म्हणून वावरत असलेल्या नेत्याने सांगितले की माझ्या पाच वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये समाजात काम करत असताना काही चुका घडल्या असतील तर त्या बाबतीत मी जाहिर माफी मागतो. मी त्या सन्मानीय नेत्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही पाच वर्षात ज्या चुका केल्या त्या चुकांबद्दल आज माफी मागण्याची आज वेळ का आली, याची आत्मपरीक्षण करा. त्यांची ही माफी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आहे. आपला स्वार्थ साधल्यानंतर कार्यकर्त्यांचा पंगा घेतल्याशिवाय हे सोडत नसतात, असेही आ. लंके म्हणाले.
साखर कारखान्यांची हमी विखेंच्या पथ्य्यावर पडणार
राज्य सरकारने राज्यातील काही साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांची कर्ज हमी दिली आहे. तीन आकडी रकमेतील कोट्यवधींची हमी मिळणार्या राज्यातील साखर कारखान्यांमध्ये नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचाही समावेश आहे. त्यात उत्तरेतील अगस्ती, संजीवनी या साखर कारखान्यांच्या जोडीने नगर लोकसभा मतदारसंघातील ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, श्रीगोंदा या साखर कारखान्यांना प्रत्येकी जवळपास शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची कर्ज हमी दिली. यातील ज्ञानेश्वर आणि श्रीगोंदा हे दोन्ही कारखाने अजित पवार समर्थक असणार्या अनुक्रमे घुले बंधू आणि नागवडे यांचे आहेत.या दोन्ही कारखान्यांना मिळालेली ही कर्ज हमी आता महायुतीचा विचार करता भाजपा उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांच्यासाठी बेरजेचीच ठरणार आहे.