नगर सह्याद्री / इंदापूर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद चर्चेत आले आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. परंतु आता या शर्यतीत छगन भुजबळ देखील आले आहेत. भावी मुख्यमंत्री असा बॅनर बाजीमुळे चर्चांना उधाण आले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये आज ओबीसी एल्गार मेळावा आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी छगन भुजबळ भावी मुख्यमंत्री म्हणत बॅनर लावण्यात आले आहेत.
काय आहे बॅनरवर उल्लेख ?
इंदापुरातील ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. इंदापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पाहिला ओबीसी एल्गार मेळावा होत आहे. एल्गार मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ थोड्याच वेळात संबोधित करणार आहेत. इंदापुरात सभास्थळी मोठ्याप्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात छगन भुजबळ यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.
अशी होती जेवण व्यवस्था
इंदापुरात ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ओबीसी एल्गार मेळाव्याला आज हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. १ टन पोहे, ५०० लिटर दूध, ५० हजार पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात पोहे, चहा, नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे.