Success Story : कोणत्याही गोष्टीमध्ये जर सातत्य, जिद्द व चिकाटी असेल तर यश हे नक्कीच मिळते. पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील प्रशांत मसे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली असून गावातील पहिलेच पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
मेसे हे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन ते पोलिस उपनिरीक्षक झाले आहेत. गुणोरे गावातील एक सर्वसामान्य शेतकरी पोपट मेसे यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांचे मोठे भाऊ महेश मेसे हे सैन्यदलात कार्यरत असून मेजर महेश यांनी प्रशांत यांच्या उच्च शिक्षणासाठी मोठे पाठबळ दिले आहे.
प्रशांत यांची सैन्यदलात जाण्याची इच्छा होती मात्र आपला भाऊ शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य आहे याची कल्पना महेश यांना असल्याने एम पी एस सी परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी प्रशांत यांना पुणे येथे पाठवले व त्यात ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक झाले आहेत.
प्रशांत यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण गुणोरे येथे झाले आहे. माध्यमिक शिक्षण जवळा येथील धर्मनाथ विद्यालयात तसेच ११ वी १२ वीचे शिक्षण शिरुर येथील कॉलेजमध्ये तसेच उच्च शिक्षण पुणे येथे झाले आहे.
वडील पोपट मेसे हे सर्वसामान्य शेतकरी आई गृहीणी अशा सर्वसामान्य परस्थितीत एम पी एस सी उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक झालेल्या प्रशांत मेसे यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
गावाचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार
आई वडील यांचे परिश्रम तसेच सैन्यदलात कार्यरत असलेला भाऊ महेश याचे सातत्याने उच्च शिक्षणासाठी पाठबळ तसेच मित्र परिवार नातेवाईक आणी ग्रामस्थ यांनी दिलेली प्रेरणा यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक झाल्याचा मला अभिमान असून गुणोरे गावातील पहिलाच उपनिरीक्षक झालो असून गाव तालुका व जिल्हा यांचा नावलौकिक वाढविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार.
– पोलिस उपनिरीक्षक प्रशांत पोपट मेसे