spot_img
अहमदनगरताबेमारीत बहुतांश नेत्यांचे पंटर; सुपार्‍या तर सर्रासच!

ताबेमारीत बहुतांश नेत्यांचे पंटर; सुपार्‍या तर सर्रासच!

spot_img

‘ताबेमारी’त मोठं अर्थकारण; आयुक्तांनाच घ्यावा लागेल पुढाकार | ‘लालटाकी’च्या जागेतील कमिशन फंड्यातील बाप्पाची भानगड वेगळीच!

मोरया रे / शिवाजी शिर्के –
बाप्पा कुठं गायब झाला या प्रश्नाचं उत्तर मनात मनातल्या मनात शोधत असताना चांदणी चौकातील पुलाखालील एका पिलरजवळ बाप्पा बसलेला दिसला! सोलापूर रस्त्याकडे एकटक पाहत बसलेला बाप्पा पाहून मलाही आश्चर्य वाटलं! गाडी बाजूला पार्क करुन बाप्पाजवळ गेलो. बाप्पाजवळ जाऊन उभा राहिलो तरीही बाप्पाची नजर सोलापूर रस्त्याकडेच!

मी- बाप्पा, काय पाहतोस रे? कोण येणार आहे का?

श्रीगणेशा- नाही रे! पण, आज तू येथे थांबू नये असं मला वाटतं! दरेवाडीत काहीतरी राडा झालाय असं समजलंय! एक व्हिडीओ माझ्याकडे आलाय आणि त्यात एकाची दुचाकी जाळली गेलीय! ज्याची दुचाकी जाळली गेलीय तो ओरडू- ओरडू सांगतोय की ही एका नेत्याची ताबामारी आहे. त्याची गँग ताबा मारत आहे. त्यातून आता काहीतरी राडा होणार अशी भिती वाटत आहे. तिकडून ही गँग आणि सारेच निघाल्याचंही कळतय! तू जा तुझ्या कामाला!

मी- बाप्पा, असं कसं! तुला असं एकट्याला सोडून मी कसा जाणार? तुझ्या जिवाला काही कमीजास्त झालं तर?

श्रीगणेशा- माझ्या जिवाची काळजी सोड रे! तुमच्या जिवाचं पहा! ताबेमारीतून असा त्रास देणं योग्य नाही! त्या बिच्चार्‍या आजीबाई देखील ताबेमारीच्या विरोधात ओरडत होत्या रे त्या व्हिडीओत! नगर शहरात ताबेमारी चालते का, या प्रश्नाचं उत्तर होय असं नक्कीच आहे. पण, ताबेमारी कोण करतं आणि त्याला पाठबळ कोणाचं या प्रश्नाच्या उत्तरात फक्त एकच नाव घेता येणार नाही. नगर शहरातील एक-दोन वगळता बहुतेक नेतेमंडळींचे पंटर यात सहभागी आहेत. (आमच्या दोघांमधील बोलणं चालू असतानाच माझ्या व्हॉटसअपवर मेसेज आल्याची रिंग वाजली. कुतूहल म्हणून पाहिले तर तो व्हिडीओ होता! दरेवाडीत ताबा मारला जात असल्याचा आरोप करणार्‍या बेरड याचाच तो व्हिडीओ होता. ताबेमारीशी नगरचे आमदार संग्राम जगताप यांचा काहीही संबंध नसल्याचे तो सांगत होता.) मी व्हीडीओ पाहत असताना बाप्पाने देखील तो पाहिला.)

श्रीगणेशा- येड्यात काढतो की काय हा बेरड नगरकरांना! आधी सांगतो, जमिनीवर ताबा मारलाय! ताबेमारी करणारी ही गँग संग्राम जगताप यांचीच! सोबत दुचाकी पेटवून दिल्याचा आरोपही करतोय! अन् काही क्षणात पुन्हा हे सारं खोटं असल्याचं सांगणारा व्हिडीओ देखील टाकतोय! म्हणजे नक्की काय समजायचं? ज्याची जमिन आहे, त्या जमिन मालक असणार्‍या धूत याने त्याच्या वकिलांना सोबत घेत सारं कसं खोटं असल्याचा व्हीडोओ तयार केला. मग, असं असताना या बेरडने कोणाच्या सांगण्यावरुन आधीचा ड्रामा केला हे शोधून काढण्याची गरज आहे. नगर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे त्यांनी या संपूर्ण घटनाक्रमाचा ‘सुमोटो’ तपास करण्याची गरज आहे. दुचाकी जाळल्याचा आरोप करताना ती कशी पेटलीय हे दाखवणारा व्हिडीओ टाकणार्‍या बेरड याची नार्कोटेस्ट करण्याची गरज आहे. आधी आरोप करायचा आणि त्यानंतर काही क्षणात पलटी मारत माघार घ्यायची! खरं तर या बेरडची चौकशी होण्याची गरज आहे. कारण, हे सारं घडत असताना व त्यानंतर याच बेरड याला पाठींबा देण्यासाठी नगर शहर आणि तालुक्यातील काही राजकीय नेतेमंडळी पोलिस ठाण्यात ठाण मांडून राहिली. त्यांच्यात पोलिस अधिकार्‍यांसमोर हुज्जत झाली आणि एकमेकांच्या आई-वडिलांचा उद्धार करणार्‍या शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या गेल्या! पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर हे सारं घडलं. यानंतर दोन्ही बाजूने पोलिसांना निवेदन देण्यात आले. प्रकरण निवेदनावर थांबले असले तरी त्याची धग लक्षात घेण्याची गरज आहे. ताबेमारीचा आरोप करणार्‍यांसह त्यासाठीच्या सुपार्‍या घेणारे आणि देणारे या दोघांच्याही चौकशीची गरज आहे. पोलिस या प्रकरणात बोटचेपे धोरण घेणार असतील तर येत्या काही दिवसात या सुपार्‍या आणखी जोरात सुरू होतील आणि त्यातून पोलिसांची डोकेदुखी वाढेल! म्हणूनच या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी स्वत: फिर्यादी होण्याची गरज आहे आणि यातील सत्य समोर आणण्याची गरज आहे. बेरड याने माफीनामा दिला असला तरी या प्रकरणातील पडद्याआड जे कोणी असतील त्यांचा शोध आता पोलिसांनीच घेण्याची गरज आहे.

मी- बाप्पा, जाऊ दे यार! प्रकरण संपले ना! माफीनामा झाला आहे आता!

श्रीगणेशा- बरोबर आहे तुझं! माफीनामा झाला असला तरी उद्या पोलिसांनी यातून बोध घेण्याची गरज आहे. दरेवाडीचं प्रकरण संपलं असलं तरी ताबेमारी संपणार आहे का? ताबेमारीचा आरोप कोणावर होतोय याहीपेक्षा ताबेमारीला प्रोत्साहन कोण देतं हे शोधलं तर किमान ९० टक्के नेतेमंडळींची नावे यात समोर येतील. उगीच साप- साप म्हणून भुई थोपटण्यात काय अर्थ आहे. ताबेमारीला खतपाणी घालणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची गरज आहे. नेता सुभाष चौकातील लोढा हाईटस या इमारतीमधील गाळ्यांचा विषय जुनाच! त्या इमारतीच्या बाजूला असणारे बेकायदा बोळीतील हॉटेल हा देखील ताबाच! त्या हॉटेलचे अनेक वर्षांपासून कोणी भाडे घेत असेल तर तेही बेकायदाच! इमारतीचे गाळे बँकेने ताब्यात घेतले असल्याचे कागदोपत्री दाखवले जाते. मात्र, ते सील केलेले नाहीत. त्या गाळ्यांमध्ये जुगार खेळली जाते! त्या जुगारात सापडलेले लोक हे देखील प्रतिष्ठीत! जुगार्‍यांचा अड्डा म्हणून ही लोढा हाईटस कुप्रसिद्ध जशी आहे तशीच ती कुप्रसिद्ध आहे ती बेकायदा बांधकामाच्या मुद्यावर! महापालिकेला कोणताही कर न देता हे गाळे बांधले गेलेत आणि त्याचे भाडे घेणारा तिसराच! या तिसर्‍याचा आणि या इमारतीचा काहीच संबंध नाही. मात्र, तरीही हे होते! ज्या अर्बन बँकेने या इमारतीसाठी कर्ज दिले, त्या कर्जाचे हप्ते थकलेले! त्यापोटी बँकेने हे गाळे ताब्यात घेण्याचे धाडस का दाखवले नाही? शहराच्या मध्यवर्ती भागात असणार्‍या या लोढा हाईटस इमारतीमध्ये पार्कींगची कोणतीही व्यवस्था नाही! संपूर्ण बांधकामच बेकायदा! छोट्या दुकानदाराने दोन फुटाचे बांधकाम अनधिकृतपणे केले असेल तर लागलीच ते पाडले जाते! या इमारतीच्या तळ मजल्यात संपूर्ण बेकायदा गाळे आहेत! या गाळ्यांचे बांधकाम तोडून तेथे पार्कीग केले तर या चौकातील वाहतूक कोंडीची मोठी समस्या सुटेल! आयुक्तांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. जागेची ताबेमारी जेवढी घातक आहे तेवढीच घातक आहे ती गाळ्यांची ताबेमारी! ताबेमारीच्या मुद्यावर सारेच बदनाम झालेत! फरक इतकाच आहे की कंबरेच्या खाली बदनाम आहेत तर काही कंबरेच्या वर! तुमची गँग ताबेमारी करतेेेेे असा आरोप करणार्‍यांची गँग दुधाचा धंदा करुन चरितार्थ चालवते का, या प्रश्नाच्या खोलातही जावे लागेल! बोगस प्लॉट, जमिनी आणि त्यांची कागदपत्रे बोगस तयार करणारी टोळी नगरमध्ये आहे. या टोळीत काही नेते स्वत: आहेत. त्यातील एकाने लालटाकी- अप्पू हत्ती चौक परिसरातील महापालिकेच्या नावे असणारा भुखंड मोठा फंडा करून कोट्यवधी रुपयांचं कमिशन देऊन गेला. पाटोळे- ढमाले ही नावे कागदोपत्री आली रे! पण, यात नगरमधील मोठं प्रस्थ गुंतलंय! त्याच्या माध्यमातून हे सारं घडलं! ते कसं घडलं आणि असे फंडे वापरणारे आणखी कितीजण आहेत यावर पुढच्या भेटीत बोलेल मी! ताबेमारीचा नरेटीव्ह सेट करणार्‍या आणि त्यातून राजकीय फायदा उठवू पाहणार्‍या मंडळींनी आत्मपरिक्षण करताना आपल्या पंटरांच्या गँग अन् आपलेही हात यात काळे झालेले नाहीत ना हे तपासून पाहण्याची गरज आहे. तूर्तास निघतोय, पुन्हा भेटूच! (दुसर्‍या क्षणाला बाप्पा लालटाकीच्या दिशेने निघाला आणि मी देखील कार्यालयाकडे रवाना झालो.)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कुछ तो गड़बड़ है! घोटाळ्यातील आरोपी पोलिसांना का सापडत नाहीत? बँक बचाव संघर्ष समितीचा सवाल

अहमदनगर | नगर सह्याद्री नगर अर्बन बँकेतील आर्थिक घोटाळा महाराष्ट्रभर गाजला. त्यानंतर बँकेचा गलथान कारभारा...

शेत जमिनीचा वाद पेटला, नको तोच प्रकार घडला! दोन गटांच्या डजनभर लोकांवर गुन्हा दाखल

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुयातील दरेवाडी येथे नारायण डोह रस्त्यावर एका शेत जमिनीच्या लोखंडी...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा मामाच्या गावातुन गजाआड; नगर शहरातील धक्कादायक प्रकार!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार करणार्‍या आरोपीस कोतवाली पोलीसांनी जेरबंद केले...

भूमिपुत्र विरूध्द लफंगा! ‘या’ मतदार संघात रंगणार सामना; कोणी केलं वक्तव्य..

जामखेड । नगर सहयाद्री:- ज्या अजितदादांनी रोहित पवारांना मोठं केलं त्यांच्याप्रति त्याची द्वेषाची भावना आहे....