जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील | समाजातील अपप्रवृत्तीला राजाश्रय हे तालुक्याला घातक
शिवाजी शिर्के | नगर सह्याद्री
आमच्या कुटुंबाला जो समाजकारण, राजकारणाचा वारसा आहे, तो यापुढच्या काळात असाच टिकून समर्पित आयष्य जगण्याचा माझा स्वत:चा मनोदय आहे. कोणतीही सत्ता नसताना देखील मला अनेक पुढार्यांकडून विकास कामे करता आली आणि त्या माध्यमातून तालुक्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावता आले. माझ्या वडिलांनी त्यांचे उभे आयुष्य जनतेच्या सेवेसाठी घालवलं आणि मी देखील तेच करत आलो आहे. यापुढच्या काळात लोकांच्या उपयोगी पडणं आणि संपुर्ण आयुष्याच समर्पण आता समाजातील रंजल्या- गांजल्या घटकांसाठी करणं हेच आता माझ्या आयुष्याचं ध्येय असणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी केले.
सुजित झावरे पाटील यांचा शनिवारी (दि.२३) वाढदिवस आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी ‘नगर सह्याद्री’ला विशेष मुलाखत दिली. लोकप्रतिनिधीचे खरे काम हे लोकांना योग्य मार्ग दाखविणे आहे. दुर्देवाने समाजातील अपप्रवृत्तीला राजाश्रय मिळत असून हे तालुक्याला घातक आहे. मी शांत विचार केला की मी आज पर्यंत ज्यांच्याशी कटुता घेतली, ज्यांच्याशी भांडत बसलो त्यातून माझ्या पदरी काहीच न पडता माझा फक्त वापर झाला हे माझ्या लक्षात आले. राजकीय समिकरणे आणि प्रवाह नेतेमंडळी त्यांच्या सोयीने बदलत असतात. मात्र, स्व. वसंतदादांवर प्रेम करणारे हजोर कार्यकर्ते आणि सवंगडी आजही आमच्या परिवारासोबत आहेत आणि तीच आमची शिदोरी आहे.
आमच्या घरी लहानपणीपासून माणसांचा राबता असायचा मला तेव्हापासून समाजकारणाची आवड लागली. स्व. आ. वसंतराव दादा ज्या पद्धतीने गोर-गरीब, आदिवासी यांचे कामे करत होते ती पद्धत मी बारकाईने अभ्यासलो. पारनेरला १३ वर्षे सभापती असताना दादांनी अलोट अशी माणसे जोडली व पुढे ते आमदार झाले. १९९९ साली ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता दादांनी पवार साहेबांबरोबर जायचे ठरवले. नारायण राणेंनी मुख्यमंत्री पदासाठी आमदारांच्या सह्यांची मोहिम घेतली, तेव्हा मला आठवते ते स्वत: मोठे आर्थिक प्रलोभन घेऊन आले होते.
परंतु दादांनी तत्वाशी तडजोड न करता एकनिष्ठेने पवार साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. सत्तेच्या हव्यास हा फारच घातक असतो व राजकारणात तत्वाला पूर्वी किंमत होती ती आता राहिलेली नाही हेही वास्तव आहे. स्व. दादांनी दुष्काळी तालुका असलेल्या पारनेर तालुक्यात काळु मध्यम प्रकल्प, भांडगाव मध्यम प्रकल्प, शिवडोह मध्यम प्रकल्प, पिंपळगाव जोगे कालवे, मांडओहळ चारी अस्तरीकरण यासहअसंख्य पाझर तलाव, विद्युत सब स्टेशन, आदिवासी योजना, पळशी येथिल आश्रमशाळा असा अनेक कोट्यावधींचा निधी तालुक्यात आणल्याची नोंद आजही कायम आहे.
सर्व काही व्यवस्थित असताना पक्षाने स्व. दादांशी २००९ साली घात केला व त्यांची उमेदवारी नाकारली. ‘दादा’ हतबल झाले ज्या पक्षाची पाळेमुळे आपण लावली जो पक्ष आपण जनतेत रुजविला तो असा आपल्याशी घातकी वागू शकतो ही वेदना त्यांना सतावत होती, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते जरी उभे राहिले तरी त्यांना फार मोठा मानसिक धक्का राष्ट्रवादीने दिला होता ते व्यक्त करत नव्हते पण मनातल्या मनात कुढत राहिल्याचे मी पाहिले आणि तालुक्यातील जनतेनेही ते अनुभवले. पुढे ते इतके अस्वस्थ झाले की त्यांनी अंथरूनच धरले. आमचा परिवार प्रचंड मानसिक तणावत होता.
२०१४ साली त्यांनी मला निवडणूक लढवण्यास मज्जाव केला व तो निरोप घेऊन मी पवार साहेब व अजितदादा यांना भेटलो व मला उमेदवारी नको, दादा आजारी आहे. त्यांची अशीच इच्छा आहे असे सांगितले. मात्र तुलाच लढाव लागेल आमच्याकडे उमेदवार नाही असे सांगितले व पक्ष प्रेमापोटी तु लढ असे सांगितले. समोर पराभव दिसत असताना याच श्रेष्ठींच्या आदेशानुसार मी लढलो. परंतु, ज्यावेळी निवडून येण्याची संधी होती त्यावेळी मात्र पक्षाने मला विश्वासात न घेताच एका रात्रीतून पक्ष बदललेल्याला मानसाला उमेदवारी देऊन टाकली. त्यामुळे मात्र मी हताश झालो, निराश झालो. त्यानंतरच्या काळात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेरच्या विकासकामांसाठी मला उजवा हात दिला. त्यामुळे पारनेरमध्ये भरीव विकासकामे करुन शकलो. मोठा निधी आणता आला हे सत्य नाकारुन चालणार नाही असे सुजित झावरे पाटील म्हणाले.
कार्यकर्ते हीच आमची शिदोरी अन् त्यांना आधार हेच माझे प्राधान्य!
माझ्या पुढे कार्यकर्त्यांचा संच टिकवायाचा कसा हा मोठा यश प्रश्न सातत्याने होता आणि आहे. माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर मी हात बांधून कधीच बसू शकत नाही. त्याच्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याचे काम मी सातत्याने केले आणि करत राहणार. स्व. दादांनी आयुष्यभर कमविलेले कार्यकर्ते हे माझे खरे वैभव आहे. कार्यकर्ते हीच आमची शिदोरी अन् त्यांना आधार हेच माझे प्राधान्य असल्याने त्यांच्याशी कधीही प्रतारणा होणार नाही याची काळजी मी सातत्याने घेत आलो आहे. स्व. दादांपासून आमचे कार्यकर्ते आमच्या सोबत सुख दु:खात राहिलेत. यापुढेही मी त्यांना कोणाकडे ही जायला लावणार नाही. मी अहोरात्र त्यांच्यासाठी काम करण्याची माझी भूमिका कायम असणार आहे.
कोणतीही सत्ता नसताना कोट्यवधींची विकास कामे!
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्यातील पहिला मिनी नदिजोड प्रकल्प राबविला व राज्यातील सर्वोत्कृष्ठ जि. प. सदस्य हा बहुमान मिळवला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वाधिक बंधारे पारनेर तालुक्यात आणले व पुर्ण केले. शाळा खोल्या, अंगणवाडी खोल्या, पाणी योजना , आरोग्य उपकेंद्रे, रस्ते यासह पाणी योजनांसह त्यांना लागणारा एक्सप्रेस फिडर, आदिवासी समाजाला दाखले वाटप, बांधकाम कामगार कल्याण योजनेत लाभार्थ्यांना साहित्य वाटप, ग्राम सचिवालये, दलितवस्ती सुधार योजना, सभामंडप अशी कोट्यवधींची विकास कामे पारनेर तालुक्यात आणली. कोणत्याही सत्तेत नसतानाही विकास कामे करण्याचे बळ फक्त आणि फक्त आमच्यावर प्रेम करणार्या कार्यकर्त्यांमुळेच येते याचाही सुजित झावरे यांनी आवर्जुन उल्लेख केला.
ज्यांना मोठे केले त्यांनीच कायम विरोधी षडयंत्र रचले!
तालुक्यातील अनेक लोकांना वसंतराव दादांनी मोठी पदे दिली. मला स्वत:ला म्हणजे मुलाला लाल दिवा न देता त्यांनी सामान्य कार्यकर्त्याला ते पद दिले. जिल्हा परिषद सभापती प. स. सभापती, मार्केट कमिटीचे चेअरमन, जिल्हा बँक, दुध संघ अशा अनेक पदांवर कार्यकर्त्यांना खुल्या मनाने संधी दिली. ज्यांच्या ताब्यात एक ठराव होता त्यांना ५६ ठराव देऊन जिल्हा बँकेचे संचालक केले. ज्या लोकांना आमच्या कुटुंबानी पदे दिली ते स्वत:ला लगेच आमदारकीच्या शर्यतीत समजू लागली अन् त्यांनीच माझ्या विरुद्ध षडयंत्र रचल्याचे वास्तवही विसरता येणार नाही.