अतिक्रमण मुद्द्यावरून सरपंचपद रद्द करण्याची मागणी फेटाळली
पारनेर | नगर सह्याद्री:-
अतिक्रमणाच्या मुद्यावरुन सुप्याच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे यांचे सरपंच पद रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे नंदकुमार पोपटराव पवार यांनी केली होती. पवार यांच्या अर्जावर सुनावणी होऊन त्यांचा अर्ज जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नामंजूर केला आहे. त्यामुळे सरपंच मनिषा रोकडे यांना दिलासा मिळाला आहे.
पारनेर तालुयातील सुपा ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांनी एकमेकांविरोधात अतिक्रमणाच्या तक्रारी केल्या होत्या. या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली.त्यात पवार यांनी केलेला अर्ज फेटाळला. नंदकुमार पवार यांनी सरपंच मनीषा रोकडे यांनी सार्वजनिक जागेत अतिक्रमण केले अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावर सरंपच रोकडे यांनी त्यांचे सविस्तर म्हणणे मांडले. व पुरावेही दिले.
सदर जनसेवा हॉटेल हे प्रसाद संभाजी रोकडे यांच्या नावावरुन आढळून आले.त्यामुळे सरपंच मनिषा योगेश रोकडे यांचा जनसेवा हॉटेलशी कोणताही संबंधून आढळून आला नाही. केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने सरपंच रोकडे यांच्या विरोधात अर्ज केला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नंदकुमार पवार यांचा अर्ज नामंजूर केला असल्याने सरपंच रोकडे यांना दिलासा मिळाला आहे.