मुंबई | नगर सह्याद्री – लोकप्रिय आणि सहकार क्षेत्रातील मोठ्या अशा अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेने [RBI] एका वर्षासाठी बरखास्त केले आहे. बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर कोणतेही निर्बंध लादले नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले असून अभ्यूदय बँकेवर प्रशासक नेमला आहे.
स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक यांची रिझर्व बँकेने अभ्युदय बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशासकांना त्यांच्या कामात सहाय्य करण्यासाठी रिझर्व बँकेने सल्लागार मंडळाची नियुक्ती केली आहे. स्टेट बँकेचे माजी सरव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे, सनदी लेखापाल महिंद्र छाजेड आणि कॉसमॉस सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांचा समावेश सल्लागार मंडळावर करण्यात आला आहे. बँकेच्या प्रशासन कार्यपद्धतीतून काही गंभीर बाबी समोर आल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे रिझर्व बँकेने म्हटले आहे. अभ्युदय बँकेच्या कामकाजावर कोणतेही आर्थिक निर्बंध लादले नसून बँक आपले दैनंदिन व्यवहार नेहमीसारखे करू शकेल, असेही रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी म्हटले आहे.
अभ्युदय सहकारी बँक १९६४ मध्ये सुरू झाली. ५००० रुपये देऊन बँकेची सुरूवात दुधाचे व्यापारी आणि लघुउद्योजकांसाठी करण्यात आली होती. यानंतर जून १९६५ मध्ये अभ्युदय को-ऑप. बँक सुरू झाली. १९८८ मध्ये बँकेला आरबीआयने शेड्यूल बँकेच्या श्रेणीत टाकले. त्यानंतर मुंबईसह अनेक मोठ्या शहरांत बँकेच्या शाखा सुरू झाल्या. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकातही बँंक व्यवसाय करते.