संगमनेर | नगर सह्याद्री-
अनेक वर्ष ठेकेदारांनी संगमनेर तालुका ताब्यात घेतला आहे. ठेकेदारांच्या टोळ्यांनीच राजकीय पद घेऊन निर्माण केलेली दहशत आता सामान्य माणसं संपवतील. या भागात निळवंडे धरणाचे पाणी आले, आता रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आपले ध्येय आहे. कोणाला खलनायक, जलनायक व्हायचे त्यांनी व्हावे पण कालव्यांची कामे रखडून तुम्हाला कोणती निर्मिती साध्य करायची होती हेही जनतेला सांगा असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
निळवंडे येथे विकसित भारत संकल्प यात्रा आणि निळवंडेचे जलपूजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत वारकरी नामदेव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच शशिकला पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जेष्ठनेते बापूसाहेब गुळवे, भाजपाचे तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ, अल्पसंख्याक आघाडीचे जावेदभाई जहागीरदार, हरिषचंद्र चकोर आदी उपस्थित होते. विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते मंजूर झालेल्या लाभाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
याप्रसंगी मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळेच तीन राज्यातील निवडणूकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश हे मोठे आहे. मोदींच्या नेतृत्वावर आणि पक्षावर जनतेने दाखविलेला विश्वास अधिक सार्थ ठरवायचा असेल तर कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन योजनांसाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे. निधीची कमतरता भासणार नाही. कोणी कितीही अडथळे निर्माण केले तरी या तालुयाची विकास प्रक्रीया आता थांबणार नाही. हा तालुका केवळ ठेकेदारांच्या दावणीला बांधला गेला आहे. मागील अडीच वर्षात निळवंडे कालव्यांची कामे जाणीवपूर्वक रखडविली होती असा घाणाघातही त्यांनी केला.