निघोज । नगर सहयाद्री:-
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असून भाजप हा आमचा पक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात महायुती जो उमदेवार देईल त्यांनाच निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी दिली आहे.
बुधवार दि.१६ रोजी माजी सभापती काशिनाथ दाते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, उद्योजक माधवराव लामखडे, माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांची भेट घेऊन पक्ष प्रवेश केला. यावेळी वराळ पाटील त्यांच्या समवेत असल्याने त्यांनीही पक्ष प्रवेश केला काय? अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली होती. याबाबत त्याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विखे पाटील आमचे नेते भाजप आमचा पक्ष हे उत्तर दिले आहे.
वराळ पाटील यावेळी म्हणाले, गेली पन्नास वर्षांपासून आमचे वडील पंचायत समितीचे माजी सदस्य मच्छिंद्र पाटील वराळ माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे कार्यकर्ते म्हणून राजकारणात सक्रिय होते. त्यानंतर माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांनी नामदार विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे समर्थन करीत विखे पाटील यांचे समवेत निष्ठेने काम केले आहे.
गेली आठ वर्षात मी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली काम करीत आहे. मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे शेकडो कोटींची विकासकामे मार्गी लागली आहेत. असे असताना आपण भाजप सांगेल तोच आमचा उमेदवार ही परंपरा जतन करणार असून महायुती जो उमेदवार देईल तो मोठे मताधिक्य मिळवून विजयी होईल अशी खात्री वराळ पाटील यांनी व्यक्त केली आहे.