Parner Sugar Factory News : कामगारांचे साडेआठ कोटी थकवले, युनियनची गुरुवारी बैठक
पारनेर | नगर सह्याद्री – सन २००५ पासून पारनेर साखर कारखान्यात [Parner Sugar Factory News] जवळपास ७०० ते ८०० कामगार काम करत होते. या कामगारांची थकीत देणी म्हणून साडेआठ कोटी रुपये थकबाकी अद्यापपर्यंत कायम आहे. कामगारांची ही देणी क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड कंपनीने द्यावी असे आदेश राज्य सहकारी बँकेचे व साखर आयुक्तांसह उपायुक्तांचेही आहेत. परंतु असे असताना कामगारांचे थकीत देणे देण्याआधीच पारनेर कारखान्याची भंगारात विक्री केली असल्याचा आरोप कामगार संघटनेने केलाय.
क्रांती शुगरने कामगारांची देणी पहिल्यांदा द्यावी मग या कारखान्याची विक्री करावी अशी मागणी सेवा निवृत्त कामगार संघटनेचे वायजी औटी यांनी केली आहे. त्यामुळे क्रांती शुगरला विरोध करण्यासाठी व यासंबंधी तीव्र आंदोलन करण्यासाठी गुरुवारी दि ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हिंद चौक पारनेर येथे बैठक आयोजित करण्यात आले असल्याची माहिती वाय.जी.औटी व शिवाजी रसाळ यांनी दिली.
क्रांती शुगरने पारनेर कारखाना परिसरात नव्या युनिटची सुरुवात केल्यानंतर या पारनेर कारखान्याच्या जुन्या साखर कारखान्याची भंगारात विक्री करण्याच्या हालचाली सुरू केल्या. ज्या ठेकेदाराला हा कारखाना विकण्यात आला आहे त्याच्या कामगारांनी या ठिकाणी आपले काम देखील सुरू केले आहे. कामगारांनी अनेक वेळा थकीत देण्याबाबत पाठपुरावा करूनही कामगारांची थकीत देणे यामध्ये भविष्य निर्वाह निधी सह इतर देणीचा समावेश आहे तो अद्याप मिळाला नाही.
पारनेर साखर कारखाना हा दोन वेळा भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. त्यावेळची देखील कामगारांची थकीत देणे कायम होती. ज्यावेळेस या कारखान्याची ३१ कोटी ७५ लाख रुपयाला क्रांती शुगरला विक्री करण्यात आली त्यावेळी राज्य सहकारी बँकेने कामगारांचे थकीत देणे देण्याबाबत आदेश दिले. परंतु अद्याप पर्यंत क्रांती शुगरने कामगारांची देणे देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे लवकर यावर कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
एक नटबोल्टही कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही
पारनेर सहकारी साखर कारखाना हा क्रांती शुगरने भंगारात विक्री केला असल्याची माहिती आम्हाला समजली आहे. राज्य बँकेसह कामगार आयुक्त उपायुक्त यांनी कामगारांची आठ कोटी पन्नास लाख रुपये देण्याची जबाबदारी क्रांती शुगरचीच असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. परंतु अद्यापपर्यंत ही देण्यात देण्यात आलेली नाही. जर हा कारखाना भंगरात विकला असेल तर या कारखान्यातून इतर वस्तू तर सोडाच एक नटबोल्टही बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा सेवानिवृत्त कामगार नेते वाय जी औटी यांनी दिला आहे.