मुंबई / नगर सह्याद्री :
महाराष्ट्रातील राजकारण सध्या विविध रंग घेताना दिसत आहे. मध्यंतरी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये झालेले बंड याने राजकारणात मोती उलथापालथ झाली. अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले. परंतु आता अजित पवार यांच्यामागोमाग शरद पवार देखील भाजपला पाठिंबा देतील असा मोठा गौप्यस्फोट आमदार रवी राणा यांनी केला आहे.
अजित पवार शरद पवार भेट :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शरद पवारांशी प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भेट झाली. यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. त्यानंतर ते लगेच दिल्लीला गेले. तेथे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीने चर्चाना उधाण आलं आहे.
शरद पवार भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अशातच आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावं यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसचे नेते मोदीना पाठींबा देतील :
पुढे बोलताना राणा म्हणाले की, आगामी काळात काँग्रेसचे अनेक नेते मोदीना पाठींबा देतील. तसेच विरोधी पक्षात कमी लोक राहतील, असेही आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. राणा यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शरद पवार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.