अहमदनगर। नगर सहयाद्री:-
नगर शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर विजेचा लपंडाव सुरु असून, त्यामुळे सर्व नागरिक पूर्णपणे मेटाकुटीला आले आहेत. दिवसा-रात्री कधीही लाईट जाते. थोडीजरी पावसाची भुरभुर झाली तर लगेच वीज पुरवठा बंद केला येतो. अनेकदा असे दिसते की, ज्या भागात मनपाचा पाणी पुरवठा वितरीत केला जातो, त्या ठिकाणी हमखास लाईट घालविण्यात येते. काही दिवसांपूर्वी शहराच्या विविध भागामध्ये डिमलाईट मुळे अनेकांच्या घरातील विज उपकरणे जळाली. याला जबाबदार कोण? असा सवाल आता नागरिक करत आहेत. महावितरणच्या गलथान कारभारात सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने विजेच्या लपंडाव, अघोघित शटडाऊनच्या विरोधात विज वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, गिरिष जाधव, बाळासाहेब बोराटे, अनिल बोरुडे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, योगिराज गाडे, अशोक बडे, पप्पू भाले, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, श्रीकांत चेमटे, गौरव ढोणे, सुरेश तिवारी, संदिप दातरंगे, अशोक दहिफळे, परेश लोखंडे, अरुण झेंडे, मुन्ना भिंगारदिवे, संजय सागांवकर, जेम्स आल्हाट, अभिजित अष्टेकर, महेश शेळके, भालचंद्र भाकरे, प्रताप गडाख, सुशांत कोकाटे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भगवान फुलसौंदर म्हणाले की, नगर शहरातील विज वितरण व्यवस्था कोलमडली असून, वारंवार लाईट जाण्याचे प्रकार होत आहेत. तसेच विजेचे बीलही अवास्तव येत आहे. एकीकडे लाईट बंद करायची व दुसरीकडे अवास्तव बिल पाठवून पठाणी पद्धतीने वसूली करायची, असे काम महावितरणने सुरु केले. ज्या पद्धतीने लाईट बील ऑनलाईन येते, त्या पद्धतीने ज्या भागात लाईट जाणार आहे, त्याची कल्पना मोबाईलवर मेसेजद्वारे दिली गेली पाहिजे.
यावेळी बाळासाहेब बोराटे म्हणाले की, ज्यावेळी लाईट जाते, त्याचवेळी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांचे मोबाईल स्विचऑफ असतात. त्यामुळे नागरिकांना लाईट कधी येणार याची माहिती मिळत नाही. तसेच नगरमध्ये भुयारी वीज लाईन टाकण्याच्या कामासाठी आलेल्या पैशाचे झाले काय? कोणत्या ठेकेदाराला काम दिले, सध्या कामाची परिस्थिती काय आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. प्रत्येक भागातील अधिकारी, कर्मचार्यांचे मोबाईल नंबर माहितीसाठी जाहीर करावे, असे सूचविले. यावेळी विज वितरण कंपनीने लेखी पत्र देऊन लवकरच शिवसेना पदाधिकार्यांशी नगर शहरातील अडचणीं संदर्भात सर्व अधिकार्यांना बरेाबर घेऊन सर्व माहिती देऊ व विज वितरणात सुधारणा करण्याचा प्रयत्न करु, असे अधिक्षक अभियंता यांनी सांगितले. यानंतर शिवसेनेचे आंदोलन मागे घेतले.