अहमदनगर | नगर सह्याद्री
विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. उपनगराचा राजा गणेश मित्रमंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये असलेल्या गणेश मूर्तीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये गुलालाच्या गोण्यांखालील तलवार, लोखंडी कोयता व अन्य काही घातक शस्त्रे आढळली असून पोलिसांनी ती जप्त केली आहेत. या घटनेमुळे विसर्जन मिरवणुकीत काही काळ खळबळ उडाल्याचे दिसून आले.
अहमदनगर शहर व उपनगारांमधे गेल्या मंगळवारी दुपारी चार वाजता मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुक काढण्यात आल्या. त्यामुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलाने मोठा बंदोबस्त ठेवला होता. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे हे स्वत: तसेच अन्य अधिकारी व अंमलदार हे शहरातील तसेच तोफखाना पोलीस ठाणे हद्द असलेल्या उपनगर भागातील मिरवणुकीतील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते. तोफखाना हद्दीतील उपनगर भागांत काही गणेश मंडळांच्या आपसात असलेल्या अंतर्गत कलहामुळे गणेश मंडळांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलेले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना माहिती मिळाली की, उपनगराचा राजा गणेश मित्रमंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये असलेल्या गणेश मूर्तीच्या ट्रॅटर ट्रॉलीमध्ये गुलालाच्या गोण्यांखाली तलवार व काही घातक शस्त्रे घातपात करण्याच्या उद्देशाने गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकार्यांनी लपवून ठेवलेली आहेत. माहितीची खात्री होताच, पोलीस निरीक्षक स्वत: शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह तात्काळ सोनानगर चौकात हजर झाले.
त्याप्रमाणे उपनगर राजा मित्रमंडळाच्या गणेश मूर्ती ठेवलेल्या ट्रॉलीची रात्री आठ वाजता पंचाच्या समक्ष झडती घेतली असता एक लोखंडी कोयता, तीन लोखंडी पाईप, एक कटावनी व एक लोखंडी पाईपला सायकलचा गियर लावून केलेल्या घातक शस्त्रासह एक बेस बॉल खेळण्याचा दांडा एका सफेद गोणीमध्ये लपवून ठेवले असल्याचे आढळून आले. ही हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोहेकॉ रणजित अजिनाथ बारगजे यांनी उपनगरचा राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोस्टे गुरनं – १०१७/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय जपे हे करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आनंद कोकरे, सपोनि उज्ज्वलसिंह राजपूत, सपोनि हेमंत थोरात, नेम. स्था. गु. शा. पोउनि शैलेश पाटील, सहायक फौजदार तनवीर शेख, पोहेकॉ दत्तात्रय जपे, सुनील शिरसाट, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, अहमद इनामदार, रंजित बारगजे, सुनील आंधळे, प्रदीप बडे, सुरज वाबळे, पोहेकॉ बेरड, स्था. गु. शा. पो. ना. वसीम पठाण, पो. कॉ. सुमित गवळी, शिरीष तरटे, सतीश त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सतीश भवर, राहुल म्हस्के, शफी शेख, संदीप गिर्हे यांच्या पथकाने केली.