अहमदनगर | नगर सह्याद्री –
Ahmednagar Crime News : कोटक महिंद्रा बँकेच्या नागापूर शाखेतील दोन कर्मचार्यांनी ग्राहकांकडून कर्ज हप्त्याची जमा केलेली सात लाख ३१ हजार ९२० रूपयांची रक्कम बँकेत न भरता परस्पर अपहार करून फसवणूक केली. या प्रकरणी कोटक महिंद्रा बँकेच्या नागापूर शाखेचे मॅनेजर संजय रघुनाथ भंडारे (वय ४५ रा. सारसनगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीवरून कर्मचारी गोविंद बबन गाडे (रा. कांबी, ता. शेवगाव) व सागर तुळशीराम शिंदे (रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा) यांच्या विरोधात अपहार, फसवणूक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कोटक महिंद्र बँकेच्या नागापूर शाखेतील वसुली प्रतिनिधी म्हणून काम करणारे गाडे व शिंदे यांनी बँकेच्या ग्राहकांकडून कर्ज हप्त्याची सात लाख ३१ हजार ९२० रूपयांची रक्कम जमा केली.
ती बँकेत न भरता परस्पर अपहार केला. यासंदर्भात बँकेने पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी अर्जाची चौकशी केली असता अपहार झाल्याचे समोर आले. यावरून मॅनेजर भंडारे यांनी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मे २०२३ मध्ये गाडे व शिंदे यांनी बँकेच्या कर्जदार ग्राहकांकडून कर्जहप्त्याची रक्कम रोख स्वरूपात जमा केली होती.
ही रक्कम कर्जदारांच्या खात्यात भरणे बंधनकारक असताना त्या दोघांनी त्याचा अपहार केला. कर्जाच्या हप्त्याच्या रक्कमेबाबत कर्जदारांकडे मागणी केली असता हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पोलिसांत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करून दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.