अहमदनगर। नगर सह्याद्री-
काही दिवसापूर्वीच एमआयडीसी परिसरात एका तरुणांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून दोघांना आग्रा, उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली आहे.
संदीप कमलाकर शेळके उर्फ बाळू (रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून विशाल चितामण जगताप (२२ रा. चेतना कॉलनी, दांगट मळा, एमआयडीसी) व साहील शेरखान पठाण ( नागापूर, एमआयडीसी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त: संदीप शेळके बुधवारी (दि. २१) दुपारी साडेबारापासून घरी आले नव्हते. दरम्यान शुक्रवारी सकाळी एमआयडीसीतील सह्याद्री कंपनीच्या पडक्या इमारतीत त्यांचा मृतदेह आढळून आला. नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळा आवळून व दगडाने डोके, चेहऱ्याचा चेंदामेंदा करून त्यांना ठार मारण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते. दरम्यान आजुबाजूस राहणान्या लोकांकडे व तांत्रिकविश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना मयत संदीप शेळके हे बुधवारी (दि. २१) विशाल जगताप व साहील पठाण यांच्यासोबत देशी दारूच्या दुकानात दारू पित बसलेले असल्याचे समोर आले.
पथकाने विशाल जगताप व साहील पठाण यांचा राहत्या घरी य आजुबाजूस शोध घेतला असता ते दोन दिवसांपासून घरी नसल्याची माहिती मिळाली. तांत्रिक विश्लेषणाचे आधारे पुढील तपास केला असता ते दोघे शहागंज मोहल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश येथे असल्याचे समोर आले.
पथकाने सदर ठिकाणी जावून त्यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याचे अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले. संदीप सोबत अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी त्याला जास्त दारू पाजून एमआयडीसीतील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या पडक्या इमारतीत नेले, मात्र त्याने विरोध करताच जिवे ठार मारले असल्याची कबुली त्यांनी दिली.