मृग सर्वदूर भरभरून बरसला। ओढे, नाले खळखळून वाहिले। पेरणीची लगबग सुरू
अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगर जिल्ह्यात यंदा वरुण राजाने कृपादृष्टी ठेवली असून यंदा मृग नक्षत्र निघाल्यापासून दररोज पाऊस चालू आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांत सर्वदूर असा पाऊस झाला असृून लहानमोठे ओढे, नाले छोट्या नद्या खळखळून वाहत आहेत. त्यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्य जनताही सुखावली आहे.
पेरणीपूर्व मशागती झाल्या असून शेतकर्यांची आता पेरणीसाठी लगबग सुरू आहे. बाजारात बी-बियाणे खरेदीसाठी शेतकर्यांची कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होताना दिसत आहे. पुढील चार दिवस अर्थात १३ ते १६ जूनपर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज कुलबा वेधशाळेेने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात येत्या चार दिवसांत वादळी वारे, विजांचा लखलखाट सोबत अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुरुवार १३ जून रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे वाहतील, विजेच्या चमचमाटास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.तसेच तासी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
शुक्रवार १४ जून रोजी वादळी वारे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. शनिवार १५ जून रोजी काही ठिकाणी वादळी वारे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवार १६ जून रोजी काही ठिकाणी तुरळक स्वरूपात हलका पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.