अहमदनगर | नगर सह्याद्री
बनावट अपंग प्रमाणपत्राच्या अनुषंगाने पुजा खेडकर प्रकरण गाजत असताना आता त्यात नगरच्या धर्मदाय उपायुक्त श्रीेमती उषा पाटील यांचे बनावट अपंग प्रमाणपत्राचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत याच विभागात कार्यरत असणार्या ज्ञानेश्वर आंधळे या कनिष्ठ कर्मचार्याने थेट राज्य शासनाकडे तक्रारी नोंदवली आहे. श्रीमती पाटील यांनी बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवले असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची सेवा समाप्त करण्याची मागणी श्री आंधळे यांनी केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की,
याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीमती पाटील या सांगली जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. श्रीमती उषा सुनिल पाटील उर्फ उषा चव्हाण यांच्या डोळ्याचे अपंगत्व हे ४०% पेक्षा खूप कमी असताना, डोळ्याने अपंग असल्याचे दाखवले असून, त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक सांगली यांच्याकडून खोटे व बनावट अपंगत्व प्रमाणपत्र घेऊन, खोट्या व बनावट अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे त्यांची दिव्यांग/अपंग प्रवर्गातून प्रथम सहाय्यक धर्मादाय आयुक्त या पदी सरळ सेवेने नियुक्ती झाली होती.
श्रीमती उषा सुनिल पाटील उर्फ उषा चव्हाण यांची खोट्या व बनावट अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांग/अपंग प्रवर्गातून धर्मादाय उप आयुक्त या पदी पदोन्नती झालेली आहे. सरळ सेवेने नियुक्ती होतांना तसेच पदोन्नतीसाठी, अशा दोन्हीसाठी श्रीमती उषा सुनिल पाटील उर्फ उषा चव्हाण यांनी दिव्यांग/अपंग प्रवर्गाचा खोट्या व बनावट अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत लाभ घेतलेला आहे. शासनाची फसवणूक केलेली आहे. महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे शासन निर्णय, क्रमांक: अप्रवि. २०१२/प्र.क्र.२९७/ आरोग्य ६, दिनांक ०६ ऑक्टोबर, २०१२ अन्वये अपंग व्यक्ती (समान संधी) संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण अधिनियम १९९५ नुसार, अपंगत्व तपासणी, मुल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठीच्या मार्गदर्शन सूचना महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या आहेत. सदरच्या मार्गदर्शन सुचनांचे पालन न करता जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली यांच्या वैद्यकिय मंडळाने श्रीमती उषा सुनिल पाटील यांना प्रमाणपत्र अदा केलेले आहे. श्रीमती उषा सुनिल पाटील यांनी काही लोकांना हातांशी धरुन, मॅनेज करुन गैरमार्गाने खोटे व बनावट अपंग/दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करुन वरीलप्रमाणे शासकीय नोकरीसाठी त्याचा गैरवापर केलेला आहे.
तक्रारदार ज्ञानेश्वर शिवनाथ आंधळे यांनी यापूर्वी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, अहमदनगर येथे निरीक्षक म्हणून यापूर्वी कार्यरत होते व श्रीमती उषा सुनिल पाटील यांचेसोबत काम केलेले आहे. तक्रारदार म्हणून मला तक्रार करण्याचे आणखी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे- श्रीमती उषा सुनिल पाटील या दि. १८/०७/२०२४ रोजी दुपारी सांगली येथील धर्मादाय उप आयुक्त कार्यालय म्हणजे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सांगली येथे स्वतः आल्या होत्या व दुपारपासून संध्याकाळ पर्यंत कार्यालयात थांबल्या होत्या व मला भेटलेल्या आहेत. तुम्ही निरीक्षक आहात, सिव्हील सर्जन (जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली) हे तुमच्या कार्यालयात धर्मादाय रुग्णालयांच्या मिटींगसाठी येत असतात, ते तुमच्या ओळखीचे असतील, त्यांना मॅनेज करुन मला अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांना सांगा, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, वाटेल ते करा पण त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी सांगा असे श्रीमती उषा सुनिल पाटील या स्वत: मला म्हणालेल्या आहेत. त्यामुळे माझी खात्री झाल्याने व त्यांनी बोगस प्रमाणपत्राचा नोकरीसाठी वापर केल्याचे लक्षात आल्याने मी सदरची तक्रार करीत आहे.
श्रीमती उषा सुनिल पाटील या सध्या जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली यांच्याकडे अपंग प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी चकरा मारीत आहेत व त्या जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली यांना प्रमाणपत्रासाठी नानाप्रकारे प्रकारे मॅनेज करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.
श्रीमती उषा सुनिल पाटील उर्फ उषा चव्हाण यांचे डोळ्याचे अपंगत्व ४०% पेक्षा कमी असून त्यांनी खोटे व बनावट अपंग/दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करुन वरीलप्रमाणे शासकीय नोकरीसाठी त्याचा वापर केलेला असल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी करतानाच पाटील यांची सेवा समाप्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
ऍड. अभिषेक भगत यांनीही केली होती श्रीमती पाटील यांची तक्रार
श्रीमती पाटील यानी बुर्हाणनगर जगदंबा देवस्थान ट्रस्टवर दोन विश्वस्त नियुक्त केले. या ट्रस्टवर विश्वस्त नियुक्त करण्याबाबत हरकत असताना व तसे निर्देश असताना श्रीमती पाटील यांनी दोन विश्वस्तांची नियुक्ती केली. पाटील यांच्या या कृतीसह त्यांच्या बनावट अपंग प्रमाणपत्राबाबत ऍड. अभिषेक भगत यांनी यापूर्वीच राज्य शासनाकडे तक्रार केली आहे. त्याचीही चौकशी आता सुरू झाली असल्याचे ऍड. भगत यांनी सांगितले.