अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर; महिला, शेतकरी, विद्यार्थ्यांना खुश करण्याचा प्रयत्न
मुंबई | नगर सह्याद्री:-
आगामी विधानसभेच्या दृष्टीने अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी मोठ्या घोषणा राज्य सरकारने केल्या आहे. महिला, विद्यार्थी, शेतकर्यांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात शिंदे सरकारने केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पा दरम्यान केली.
विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यावेळी प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे सरकारने केली आहे. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिले पाहिजे. एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर केली.
यात ५२ लाख १६ हजार ४०० कुटुंबांना लाभ मिळेल. पर्यावरण संरक्षण केलं जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान १० हजार होते ते आता २५ हजार केलं आहे. स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात ७८ हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देऊ. हर घर नल, हर घर जलसाठी १ कोटी २५ लाख ६६ लाख घरांना नळजोडणी दिली आहे. राहिलेल्या घरांचे काम प्रगतीपथावर आहे, असेही अजित पवार म्हणाले.
महिलांना केंद्रस्थानी ठेवून शिंदे सरकारने विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस पाडला. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार, लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या. घर खरेदी साठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला चांगलाच फटका बसला. असे असतानाच आता आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मराठा फटका महायुतीला बसला. तसेच मुस्लीम समाजाने देखील महायुतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे राज्यसरकारने आज अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
महिलांचे आर्थिक स्वावलंबन, वय २१ ते ६० वर्षापर्यंत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रूपये प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी ४६ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या जुलै २०२४ पासून योजना राबवण्यात येणार आहे.
ई पंचनामा संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार
नैसर्गिक आपत्तीमुळे परिणाम झालेल्या शेतकर्यांना मदत केली जात आहे. राज्यातील ४० तालुयांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून विविध सोयी पुरविण्यात आल्या आहेत. ई पंचनामा संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे. याशिवाय ९२ लाख शेतकरी कुटुंबांना अनुदान देण्यात मंजूर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा
अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणआर आहेत. या योजनेचा फायदा ५२ लाख कुटुंबियांना होणार आहे.