कोरठण खंडोबा देवस्थान न्यासाचा कारभार मनमानेल तसा केला नाही : माजी अध्यक्ष ॲड.पांडुरंग गायकवाड
पिंपळगाव रोठा / नगरसह्याद्री : कोरठण खंडोबा देवस्थान ट्रस्टचा कारभार आपण मागील ३० वर्षे विश्वस्त आणि १५ वर्षे अध्यक्ष म्हणून देवाचा सेवाभाव म्हणून पाहिलेला आहे. भाविक भक्त, देणगीदार, ग्रामस्थ आणि शासन सर्वांच्या माध्यमातून, सहकार्यातून देवस्थानचे वाढलेले वैभव आणि विकास हीच त्याची खरी पावती आहे.
मनमानेल तसा न्यासाचा कारभार केला नाही. म्हणूनच सर्वांच्या माध्यमातून सलग ३० वर्ष विश्वस्त राहण्याची सेवा संधी लाभली असे प्रतिपादन देवस्थानचे माजी अध्यक्ष ॲड.पांडुरंग गायकवाड यांनी करत अध्यक्ष शालिनी घुले यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे.
अध्यक्ष शालिनी घुले यांनी माजी अध्यक्ष ॲड.पांडुरंग गायकवाड यांच्यावर विविध आरोप केले होते. तसे वृत्तही छापून आलेले होते. यावर उत्तर देताना गायकवाड यांनी खुलासा केला आहे की, देवस्थानचा दरवर्षी होणारा कीर्तन सप्ताह सोहळा चंपाषष्ठीला जोडून साजरा करण्याची १२ वर्षाची चालत आलेल्या परंपरेप्रमाणेच यावर्षीही नियोजन करावे यासाठी ॲड.पांडुरंग गायकवाड आणि विश्वस्त रामदास मुळे यांनी धर्मदाय उपायुक्त कार्यालयाकडे कलम ४१ अ नुसार निर्देश देण्याबाबत अर्ज दाखल केला होता.
त्यामध्ये अध्यक्ष व सचिव यांना पक्षकार केले. परंतु इतर विश्वस्तांना पक्षकार केले नव्हते. तसेच विषय पत्रिकेवर असा अर्ज कायदेशीर होत नाही. त्यासाठी ठराव होऊ देणे आवश्यक असल्याची निरीक्षणे नोंदवून अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्यानंतरच्या बातम्यांमधून माजी अध्यक्षावर अनेक असंयुक्तिक आरोप करण्यात आले. त्याबाबत खुलासा दिला आहे.
धर्मदाय उपायुक्तांच्या निकाल पत्रातील परिच्छेद १ मधील व परिच्छेद २ मधील मजकूर हा अर्जदारांचे अर्जातील कथने आहेत. परिच्छेद ३ मधील मजकूर प्रतिवादी नंबर १ अध्यक्ष शालिनी घुले यांचे दाखल म्हणणे मधील कथने आहेत. आणि परिच्छेद ४ मधील मजकूर हा धर्मदाय उपायुक्त यांनी सदर अर्जाबाबतची निरीक्षणे व निकाल असल्याचे ॲड. गायकवाड यांनी म्हटले आहे.