अहिल्यानगर । नगर सहयाद्री
रस्ता वाहतूक नियमाचा भंग केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करत असल्याच्या रागातून दोघांनी अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण केली. पत्रकार चौक ते डीएसपी चौक रस्त्यावरील झुलेलाल चौकात बुधवारी (9 ऑक्टोबर) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. अतुल बाजीराव लगड (वय 43) असे मारहाण झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल संभाजीराव धोंडे (वय 36 रा. सडे ता. राहुरी), सुनील सदाशिव पटारे (वय 32, रा. वांबोरी, ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
नेमकं प्रकरण काय?
अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेत अंमलदार लगड कार्यरत आहेत. ते बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, अंमलदार लगड व इतर सहकारी झुलेलाल चौकात वाहतूक कोंडी काढत असताना तारकपूर बस स्थानकाकडून एक कार (एमएच 17 सीएक्स 9011) आली व रस्त्याचे काम सुरू असलेल्या बाजूला वळत असताना लगड यांनी त्याला त्या दिशेने वळण्यास विरोध केला. कार रस्त्यात थांबल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. याबाबत निरीक्षक बोरसे यांच्या सांगण्यावरून लगड यांनी दंडात्मक कारवाई करण्यासाठी कारचा फोटो काढला असता कार मधील व्यक्तींनी खाली उतरून लगड यांना मारहाण केली.
सरकारी कामात अडथळा; दोघांवर गुन्हा दाखल
अंमलदार लगड करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कार मधील दोघांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनीतात्काळ ताब्यात घेत तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. त्यांनी त्यांची नावे अमोल संभाजीराव धोंडे, सुनील सदाशिव पटारे अशी सांगितली. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.