पुणे। नगर सहयाद्री-
लोकसभेच्या नगर मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच पारनेरचे आमदार निलेश लंके देखील अॅक्टीव्ह झाल्याचे दिसून येत आहेत. एकीकडे आमदार लंके यांनानगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता असून दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगर दक्षिणमध्ये तुतारी वाजणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर देखील भाष्य केलं आहे.
जयंत पाटील म्हणाले, मनसेने भाजपला का पाठिंबा दिला? हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडला आहे. भाजपकडे एवढे संख्याबळ असताना त्यांना आणखी पक्षांची गरज का पडली? याचा अर्थ आपण विजयी होऊ असा आत्मविश्वास भाजपला नाही, असा टोला लगावला.
तर आमदार नीलेश लंके यांच्याविषयी आत्मविश्वास व्यक्त करतानाच, लंके हे फार लोकप्रिय आहेत. ते उभे राहिले तर १०० टक्के निवडून येतील. लंके लोकसभेचे उमेदवार व्हावेत असे आम्हाला वाटते. शिवाय नगर दक्षिणमध्ये तुतारी वाजणारच, असा विश्वास देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.