बीड / नगर सह्याद्री –
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल घेत नाही. जेव्हा जेव्हा अन्याय होतो, तेव्हा उठाव करावा लागतो. देवदूतांनाही उठाव करावा लागला. छत्रपती शिवरायांनी देखील उठाव केला होता. त्यामुळे आम्हालाही उठाव करावा लागतोय. 17 जातींचा ओबीसीत समावेश झाला, तेव्हा त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का? मराठा समाजाला ओबीसीत घ्यायचे म्हटले की धक्का लागतो, असा सवाल उपस्थित करून आता उलथापालथ करावीच लागेल, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात बोलताना केला. नारायणगडावरील दसरा मेळावा हाऊसफुल झाला होता. संपूर्ण राज्यातून मराठा बांधव दाखल झाले होते.
नारायणगडावरील आजच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मनोज जरांगे पाटील काय बोलतात, याची उत्सुकता लागली होती. ९०० एकरवरील हा मेळावा खर्या अर्थाने चर्चेत होता. जरांगे पाटील यांचे सजवलेल्या रथावरून व्यासपीठावर आगमन झाले.
त्यांनी आपल्या भाषणात म्हटले, आमच्या बापाच्या डोळ्यात येणारं पाणी आम्हाला बघवत नाही. मी जीवंत असेपर्यंत मला त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघवत नाही. आता झुकायचं नाही, कोणते पाप करायचे नाही, कोणावर अन्याय करायचा नाही. पण स्वरक्षण करण्यासाठी कमी पडायचे नाही. मी अनेकदा विचारतोय, आमचा दोष काय, उत्तर कोणीच देत नाही. आपले सोन्यासारखे लोकं वाचवा, समाज वाचवा. मराठा समाजाच्या लेकरांना मान खाली घालावी लागेल असं वागू नका, तुमचे लेकरं अधिकारी बनलेले बघायचे आहेत. अन्याय सहन करायचा नाही. न्यायासाठी कठोर आंदोलन सुरू ठेवायचे. इथे जातीचा संबंध नाही. प्रत्येक जात केंद्र आणि राज्याच्या सुविधा घेते, तो जातीवाद नाही का? मग आम्ही पण आमच्या सुविधाच मागत आहोत, असे म्हणत जरांगे पाटील पुढे म्हणाले, मला संपवण्यासाठी अनेक षड्यंत्र रचले गेले.
मला होणार्या वेदना मी चेहर्यावर कधीच आणत नाही. मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत होतोय. आता उलथापालथ करावीच लागेल, असे आवाहनही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मेळाव्याच्या माध्यमातून केले. सकाळपासूनच राज्यभरातील मराठा बांधव नारायणगडच्या दिशेने येत होते. दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. हजारो मराठा बांधव तिथपर्यंत पोहचूच शकले नाहीत. या मेळाव्यात येणार्या प्रत्येक बांधवांची चहा-पाणी, खिचडी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. मेळाव्याच्या व्यासपीठावर नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज उपस्थित होते.
आचारसंहिता लागायच्या आत सगळ्या मागण्या पूर्ण करा
तुम्ही कितीही आंदोलने करा आम्ही तुमच्या नाकावर टिच्चून निर्णय घेतलाय, असे ते म्हणाले. आपल्यावर आपल्या डोळ्यादेखत अन्याय करत असले तर समोरच्याला उचलून फेकावे लागणार, असे जरांगे म्हणाले. आचारसंहिता लागल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करणार असल्याचे विधान यावेळी त्यांनी केले. इथून मला सर्वकाही सांगता येणार नाही. आता सर्व जवळ आलंय. त्यांनी सर्व केल्याशिवाय आपला निर्णय घ्यायचा नाही. एकाएकी उलटा निर्णय घ्यायचा. तुमची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. तुमचा मान, शान, लेकरं सुखी करण्याची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली. आचारसंहिता लागायच्या आत सगळ्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा सरकार उलथवून टाकायला हा समाज मागे पाहणार नाही, असा थेट इशाराच जरांगेंनी दिला.
अन्याय झाला तर स्वसंरक्षण करावचं लागेल
अन्यायाच्या विरोधात उठाव करावाच लागतो. का आमच्या वाट्याला अन्याय आलाय. असं आम्ही काय पाप केलं? माना आमच्या कापल्या पण न्याय तुम्हाला दिलाय. मग आमच्यावर अन्याय का? असा प्रश्न त्यांनी विचारला. मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. कोणत्याही जहागीरदाराची औलाद येऊदे. झुकायचं नाही. कोणावर अन्याय करायच नाही. पण समाजावर अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करावचं लागेल, असे ते म्हणाले
जाताना आनंद घेऊन जा. दु:ख मला देऊन जा
आपल्याला जाणिवपूर्वक टार्गेट केलं जातंय. तुमच्या लेकरांसाठी, समाजासाठी आपल्याला उलथापालथ करावीच लागणार आहे. मला एकच वचन द्या. हट्ट धरु नका. मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही.तुमचं हीत सोडून काम करणार नाही, असा शब्द जरांगेंनी मराठा समाजाला दिला. जाताना आनंद घेऊन जा. दु:ख माझ्याकडे देऊन जा. वेळप्रसंगी मरण पत्करेल पण तुमची मान खाली घालू देणार नाही, असेदेखील जरांगे यावेळी म्हणाले.