नागपूर। नगर सहयाद्री
मान्सूनने राज्यातून काढता पाय घेतला आणि गुलाबी थंडीची चाहूल लागली. मात्र, पावसाच्या अनपेक्षित हजेरीने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. बुधवारी सिंधुदुर्गापासून कोल्हापुरापर्यंत पाऊस झाला. महाराष्ट्राची राजधानी मुंबईदेखील अपवाद ठरली नाही.
दक्षिण भारतातही अनेक राज्यांना पावसाने झोडपले. दरम्यान, हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस राज्याच्या काही जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावू शकतो.
त्यामुळे यंदाची दिवाळी पावसाळी असण्याची दाट शयता आहे.दक्षिण भारतातील पावसाचा काहीसा परिणाम म्हणून गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसांत पावसाची शयता आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली भागात दोन दिवस पाऊस असेल. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात ढगाळ वातावरण असेल. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे आणि राज्यातील तापमानात मोठे बदलही पाहायला मिळत आहेत.