अहमदनगर | नगर सह्याद्री
महागड्या मोटारसायकल चोरून विकणार्या दोघांना पांढरी पूल, अहमदनगर येथून स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. अमित अशोक नगरे (वय २६, रा. नेवासा), नाझिन अजिज शेख (वय २२, रा. लक्ष्मीनगर, ता. नेवासा) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख २५ हजारांची बजाज पल्सर, दीड लाखांची बजाज पल्सर व १ लाख ७५ हजार रुपयांची केटीएम अशा एकूण साडेचार साडेचार लाख रुपयांच्या तीन महागड्या मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
अधिक माहिती अशी : ४ मे २०२३ रोजी कुणाल सुरेश गुप्ता (वय ३३, रा.क्रांती चौक, ता.राहुरी) यांची बजाज पल्सर मोटार सायकल चोरी गेली होती. त्यांनी याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अहमदनगर जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते.
त्यांनी बापूसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, रविंद्र घुगांसे, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड व संभाजी कोतकर आदींचे पथक नेमून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार तपास सुरु असताना वरील चोरी ही आरोपी अमित नगरे याने केली असल्याची व तो चोरीची पल्सर मोटार सायकल विक्री करण्यासाठी पांढरीपूल येथे येणार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने कारवाई करत छापा टाकला असता वरील आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना राहुरी पोलीस ठाण्यात हजर केले असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.