राहुरीसह, श्रीगोंदा, पाथर्डी, पारनेरमध्ये लढती लक्षवेधी होणार | नगर शहर अन् कर्जत-जामखेडमध्ये विरोधी उमेदवार ठरेना
सारिपाट | शिवाजी शिर्के:-
न गर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात स्वत:च्या कार्यकर्त्यांची मोठी फौज असणार्या विखे पाटलांची भूमिका कायमच निर्णायक ठरत आली आहे. सुजय विखे पाटील यांनी राहुरीतून लढण्याची भूमिका जाहीर केल्यानंतरही ते प्रत्यक्षात तसे करणार नाही याचा अंदाज राजकीय धुरीणांना लागलाच! राहुरीतून कर्डिलेच उमेदवार असतील असे सुजय विखे यांनी जाहीर केल्यानंतर दोन दिवसातच कर्डिले हे श्रीगोंद्यातून लढणार अशा बातम्या समोर आल्या आणि पाचपुतेंचे टेन्शन वाढले. सुजय विखे यांची उमेदवारी नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघातून नसली तरी त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे पाहता त्यांची मतेच निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळेच राहुरीसह, श्रीगोंदा, शेवगाव- पाथर्डी, पारनेर या चार मतदारसंघातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. याशिवाय नगर शहर आणि कर्जत- जामखेड या दोन मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या विरोधात कोण याचे उत्तर अद्यापतरी आलेले नाही.
राहुरी मतदारसंघावर विखेंचे पकड असली तरी गत लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठे मताधिक्य मिळाले नाही हे वास्तव! राहुरीतून स्वत: सुजय विखे हेच उमेदवार असल्याची चर्चा झडत आहे. स्वत: सुजय यांनीही तसे सुतोवाच केले. मात्र, प्रत्यक्षात या मतदारसंघातील शिवाजीराव कर्डिले यांच्याशी विखे पाटलांचे असणारे सख्य विचारात घेता आणि गत निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांनी विखे यांच्यासाठी घेतलेले कष्ट पाहता सुजय विखे येथून लढण्याची शक्यता कमीच वाटते. या मतदारसंघात प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून मोठे काम उभे केले आहे. याशिवाय मतदारसंघावर मोठी पकडही निर्माण केली आहे. कर्डिले यांना येथून निवडणूक जिंकण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. राहुरीत विखे पाटलांचे असणारे थेट संबंध विचारात घेता तुुलनेने कर्डिले यांच्यापेक्षा विखे यांना येथून प्रतिसाद मिळू शकतो. मात्र, असे असले तरी त्यासाठी विखे आणि कर्डिले यांच्यात सहमती होण्याची गरज आहे.
राहुरीबाबत सहमतीने निर्णय होईल किंंवा नाही याबाबत संदिग्धता असताना श्रीगोंदा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले यांच्या उमेदवारीची मागणी पुढे आली. कर्डिले यांच्या हक्काच्या नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटातील गावे ही त्यांची मोठी बेरीज असणार आहे. याशिवाय जावई जगताप यांच्या माध्यमातून श्रीगोंद्यातील एका जिल्हा परिषद गटाची बेरीज होऊ शकते. व्यक्तीगत संपर्क आणि पक्षाची मते या जोरावर कर्डिलेयांना राहुरीपेक्षा श्रीगोंद्यातील लढाई सोपी वाटत असून श्रीगोंदेकरांनीही त्यांना घातलेली साद चर्चेत आली आहे. आ. बबनराव पाचपुते हे आजारपणाने त्रस्त असल्याने त्यांची या मतदारसंघावरील पकड राहिलेली नाही. पत्नी अथवा मुलगा असा पर्याय त्यांच्यासमोर असला तरी पक्षानेही हा पर्याय स्वीकारला पाहिजे. श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे, राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार, साजन पाचपुते, घनश्याम शेलार ही नावे देखील चर्चेत आहेत.
शेवगाव- पाथर्डी या मतदारसंघातून सलग दोनवेळा मानिकाताई राजळे यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. लोकसभा निवडणुकीत येथील राजकीय वारे भाजपाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात राहिले. सातत्याने भाजपासोबत राहिलेला येथील मतदार यावेळी भाजपाच्या विरोधात गेला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजळे यांच्या विरोधात रान पेटविण्यात प्रताप ढाकणे हे आघाडीवर राहिले. लोकसभा निवडणुकीच्या संग्रामात त्यांनी आपले स्वत:चे फायर ब्रँड मार्केटींग केले. भाजपाच्या विरोधात रान पेटविण्यात ढाकणे आघाडीवर राहिले आणि त्याच आधारावर या मतदारसंघात आता प्रताप ढाकणे यांचे नाव राजळे यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून पुढे आले आहे. मात्र, या मतदारसंघात नरेंद्र आणि चंद्रशेखर घुले हे घुले बंधू काय भूमिका घेतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
पारनेरमध्ये भाजपाकडे उमेदवारांची मोठी गर्दी असल्याचे चित्र रंगवले जात असले तरी यातील एकदोन जणांचा अपवाद वगळता बाकी सारे चेहरे ‘एक ना धड… भाराभर…’ या युक्तीप्रमाणे आहेत. राणीताई लंके या शरद पवार गटाच्या येथील उमेदवार असणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी या मतदारसंघावर आपली पकड किती घट्ट आहे हे दाखवून दिले आहे. विरोधी उमेदवार कोण हे अद्यापही नक्की झालेले नसताना राणीताई लंके यांनी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच्या दुसर्या दिवसापासून आपल्या प्रचारास प्रारंभ केलाय! त्याच या मतदारसंघात आजतरी आश्वासक चेहरा आहेत. त्यांच्या विरोधात सुजित झावरे हे एकमेव नाव आज आघाडीवर आहे. संदेश कार्ले, रोहीदास कर्डिले यांची नावे पारनेरला जोडलेल्या नगर तालुक्यातील दोन गटांमधून चर्चेत आली असली तरी त्यांना बंडखोरी करणे हाच पर्याय आहे. राणीताई लंके यांना टाळून ठाकरे गटातील संदेश कार्ले आणि शरद पवार गटातील रोहीदास कर्डिले यांना उमेदवारी मिळणार नाही हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. अशीच अवस्था पारनेरच्या डॉ. श्रीकांत पठारे यांचीही आहे. पठारे, कार्ले आणि कर्डिले यांना उमेदवारी करताना बंडखोरी हाच एकमेव पर्याय आहे आणि हे तिघेही त्या भानगडीत पडतील अशी आज तरी परिस्थिती नाही. सुजित झावरे यांनी तयारी चालवली आहे.
त्यांच्याशिवाय विश्वनाथ कोरडे यांचेही नाव भाजपाकडून चर्चेत आहे. नगर तालुक्यातील जनतेने स्वाभिमानाच्या मुद्यावर एकच उमेदवार दिला तर तो पारनेरमधील उमेदवारास तगडे आव्हान देऊ शकतो. नगर शहरात विद्यमान आ. संग्राम जगताप यांच्या विरोधात प्रमुख चेहरा आजही समोर यायला तयार नाही. जगताप यांनी सत्तेचा फायदा उठवत नगर शहरात विक्रमी विकास कामे केली आणि विकास कामांसाठी निधीही आणला. त्यांच्या विरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असताना त्यास ते कसे उत्तर देतात यावर बरेच काही अवलंबून आहे. मात्र, आज तरी त्यांच्या विरोधात प्रमुख चेहरा समोर आलेला नाही. असे असले तरी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, भाजपाकडून माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर, वसंत लोढा, काँग्रेसचे किरण काळे, माजी महापौर अभिषेक कळमकर या नावांबाबत चर्चा आहे.
याशिवाय एकनाथ शिंदे गटाचे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना या पदावरुन हटविल्यानंतर त्यांनी शरद पवार- जयंत पाटील यांची घेतलेली गुप्त बैठक आणि त्या बैठकीत सातपुते यांच्या उमेदवारीबाबत दोघांकडून झालेली चाचपणी हा विषय देखील चर्चेत आला आहे. अर्थात आज तरी संग्राम जगताप यांच्यासमोर नक्की कोण हे ठामपणे समोर यायला तयार नाही. कर्जत- जामखेड या मतदारसंघातून रोहीत पवार हेच उमेदवार असणार आहेत. त्यांच्यासमोर राम शिंदे हे भाजपाचे उमेदवार असणार किंवा कसे हे अद्यापही ठरायला तयार नाही. रोहीत पवार हे पुण्यातून लढणार असल्याच्या बातम्या येत असताना ते कर्जत- जामखेडमधूनच लढणार असल्याचे अधिकृतपणे सांगितले जात आहे. येथील जागा जिंकायची असेल तर राम शिंदे यांनाच मैदानात उतरावे लागणार आहे. मात्र, त्यांनी अद्यापतरी आपली भूमिका जाहीर केलेली नाही.