अहमदनगर । नगर सहयाद्री:-
शहरात पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ फुटल्याने शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गॅस पाईपलाईन टाकणार्या ठेकेदाराच्या मशिनचा धक्का लागून ही जलवाहिनी फुटल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मंगळवारी रात्री (१३ ऑगस्ट) स्टेशन रोड परिसर, सारसनगर व बुरुडगांव रोड परिसर या भागास पाणी पुरवठा झालेला नाही.
दोन दिवसांपूर्वीच नांदगाव येथे जुनी जलवाहिनी फुटल्याने काही उपनगर भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. आता पुन्हा शहरात जलवाहिनी फुटल्याने संपूर्ण स्टेशन रोड परिसर, सारसनगर व बुरुडगांव रोड परिसर या भागास पाणी पुरवठा झालेला नाही. या भागास जलवाहिनी दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पाणी वाटप करण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनीची दुरुस्ती सुरू होती.
रात्रीतून काम पूर्ण करून बुधवारी (१४ ऑगस्ट) या भागास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे अभियंता गणेश गाडळकर यांनी सांगितले. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगलगेट, झेडीगेट, रामचंद्र खुंट, दाळमंडई, जुने कलेटर ऑफिस परिसर, हातमपूरा, धरतीचौक, बंगाल चौकी या नागरी भागास आज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.