अहमदनगर। नगर सहयाद्री
जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस प्रश्नासन अलर्ट मोडवर दिसत आहे. नुकतीच नगर-मनमाड महामार्गावर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई करत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असल्याची घटना ताजी असताना आता थेट सलून व स्पा सेंटरमध्ये अश्लील चाळे सुरु असल्याची धक्कादायक घटना पोलिसांच्या छाप्यानंतर उघडकीस आली आहे.
कॅफे शॉपच्या नावाखाली मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रमाण सावेडी उपनगरात वाढले आहेत. अशा कॅफे शॉपचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकाला दिले होते. त्यानुसार सावेडी उपनगरातील तीन कॅफेंवर तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी व शनिवारी कारवाई केली.
पथकाने शुक्रवारी सायंकाळी सावेडीतील पंपिंग स्टेशन न रस्त्यावरील ताठेनगर येथील गोल्ड स्टार कॅफेवर छापा घातला. कॅफेमालक ओंकार ताठे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. बाबालिकाश्रम रस्त्यावरील ऑरेंज कॅफेवर पोलिसांनी शनिवारी दुपारी कारवाई केली. या कॅफेचा मालक अविनाश विलास ताठे (वय ३०, रा. ताठेनगर, सावेडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
तसेच, दिल्लीगेट परिसरातील सायबर सिटीच्या पाठीमागे लाईफ लाईन कॅफेवरही पोलिसांनी शनिवारी दुपारी कारवाई केली. या कॅफेचा मालक मंगेश गोरख कोळगे (वय २४, रा. चास रस्ता, अकोळनेर, ता. नगर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही कॅफेत मुले व मुली अश्लिल चाळे करताना मिळून आली होती. त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.
तसेच पाईपलाइन रस्त्यावरील श्रध्दा एनक्लेव्ह नावाच्या इमारतीत निर्वाना फॅमिली सलून ऍण्ड स्पा नावाचे सलूनमध्ये पुरुष व महिलांना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याचा प्रकार पोलिसांच्या छाप्यातून समोर आला आहे. या सलूनचा मालक राहुल चंद्रकांत बागल (वय ३७ रा. ठाणे वेस्ट, हल्ली रा. पाईपलाइन रस्ता, एकवीरा चौक, सावेडी) याच्याविरूध्द देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.