बारामती/ नगर सह्याद्री
बारामतीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होते. पवार व बारामती असं ते घट्ट नातं आहे. बारामती म्हटलं शरद पवार आणि शरद पवार म्हटलं की बारामती असं हे समीकरण मागच्या 50 वर्षांहून अधिक काळ चालत आले आहे.
मात्र राष्ट्रवादी पक्षातच फूट पडल्यानंतर अजित पवार भाजपसोबत गेले. या सगळ्या घडामोडीनंतर राज्यात पहिलीच निवडणूक पार पडली. राज्यातील अडीच हजार ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे.
अशात बारामतीतील परिस्थिती काय आहे? बारामती पवारसाहेबांची की अजितदादांची? या प्रश्नाचं उत्तर बारामतीतील ग्रामीण भागातील जनतेनं या ग्रामपंचायत निवडणुकीत दिलं आहे.
बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यापैकी 26 ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. या 26 पैकी 24 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. तर दोन ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच निवडून आला आहे.
चांदगुडेवाडीत व पारवडीतही भाजप उमेदवाराचा विजय झाला आहे. या दोन गावांमध्ये भाजपचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. बारामती तालुक्यात आत्तापर्यंत 26 पैकी 24 जागी राष्ट्रवादीचा सरपंच तर 2 जागी भाजपचा सरपंच निवडून आला आहे.