कवडीमोल भाव / फळउत्पादक शेतकरी हवालदील | शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी
सुनील चोभे। नगर सहयाद्री-
अगोदरच पाचवीला पुंजलेला दुष्काळ, कांदा, दूधाला नसलेला बाजारभाव, वेळी अवेळी पडणारा अवकाळी पाऊस, पाण्याचे दुर्भीक्ष या संकटामुळे अगोदरच संकटात सापडलेला शेतकरी संत्राला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने हवालदील झाला आहे. कुणी संत्री घेता का संत्री, असे म्हणण्याची वेळ शेतकर्यांवर आल्याचे भयानक वास्तव आहे.
यंदा अहमदनगर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १३० मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. उत्तरेपेक्षा दक्षिणेत पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. तसेच ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. नगर तालुक्यातील खडकीसह बाबूर्डी बेंद, खंडाळा, धोंडेवाडी, जाधववाडी, शेंडी, पोखर्डी, पिंपळगाव उज्जैनी, जेऊर परिसरात संत्रा फळबागांचे प्रमाण मोठे आहे. शेतकर्यांनी मागील २०१८-१९ च्या कडक दुष्काळात टँकरने पाणी घालून फळबागा जगवल्या आहेत. कर्ज काढून, विकतचे पाणी टाकून फळबागा जगवल्या.
तळहाताच्या फोडाप्रमाणे फळबागांची काळजी घेतली. यंदा शेतकर्यांचा खरिपा पाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेला. अत्यल्प पावसामुळे फळबागांचा मृग बहारही कमी प्रमाणात बहरला. काही ठिकाणी मृग बहारमधील संत्रा सध्या तोडणीला आहे. परंतु, सध्या बाजारात एकाच वेळी नागपूर, अमरावती, राजस्थान येथीलही संत्रा बाजारात आल्याने संत्राला बाजारभाव मिळत नाही. पर्यायाने शेतकर्यांना कवडीमोल भावात संत्रा विकावा लागत आहे. केलेला खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकर्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढवले आहे.
मालाची आवक जास्त
यंदा नागपूर, अमरावती, राजस्थान येथील संत्रा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. तसेच नगरमधील संत्रा बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. एकाच वेळी सर्व ठिकाणचा माल बाजारात आल्याने सध्या संत्र्याचे बाजारभाव कमी झाले आहेत. अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहिल.
– नारायण रोडे, संत्रा व्यापारी
शेतकर्यांना कोणी वालीच नाही
गेल्या तीन-चार वर्षापासून समाधानकारक आणि वेळेत पाऊस होत नसल्याने फळ उत्पादक शेतकर्यांच्या हातून मृग बहार वाया जात आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या डोक्यावरील कर्ज कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे. शेतकर्यांचा माल बाजारात आला की त्या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे फळ उत्पादक शेतकरी अक्षरशः प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे.
– रघुनाथ चोभे, शेतकरी
नगरमध्ये २५/३० रुपये किलो
नगरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत्राची मोठ्या प्रमाणात आवक आहे. नगरमध्ये संत्राला चांगल्या मालाला ४० रुपयांपर्यंत बाजार भाव मिळतो. सरासरी २० ते २५ रुपये भाव मिळत आहे. तसेच कमी पाण्यामुळे संत्राला मोठ्या प्रमाणात गळ आहे. तसेच संत्र्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते.