नगर सहयाद्री टीम-
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांमध्ये आजच मतमोजणी होत असून चारही राज्यांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर होती. काँग्रेसची सत्ता येईल असंच वातावरण होतं. मात्र, जसजशी मतमोजणी पुढे सरकत गेली, तस तसा कल भाजपच्या दिशेने झुकू लागला आहे. या कलांनाच कलाटणी मिळाली आहे. चारपैकी तीन राज्यातील कलांमध्ये भाजप आघाडीवर आहे.
त्यातील राजस्थानमध्ये सत्ता परिवर्तनाची परंपरा अबाधित राहिली आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप पूर्ण बहुमताने पुन्हा एकदा सत्तेत येताना दिसत आहे. त्यामुळे आता राजस्थानमध्ये भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामध्ये राजस्थानमधील योगी बाबा बालकनाथ यांचं नाव आघाडीवर आहे.
कोण आहे ‘योगी बालकनाथ’?
हरियाणातील रोहतक येथील बाबा मस्तनाथ मठ अस्थल बोहरचे महंत चांदनाथ यांचे बालकनाथ शिष्य आहेत. २०१९ मध्ये अलवरमधून त्यांनी पहिली लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या भंवर जितेंद्र सिंह यांचा पराभव केला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनीही त्यांच्या निवडणूक प्रचाराला हजेरी लावली होती. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांची ‘भावी मुख्यमंत्री’ अशीही वर्णी लागली होती.